नुकत्याच झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी चांगली झाली. पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, निर्णायक सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता बाबर आझमचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे, तेथे ते शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पहिला टी३० सामना खेळणार आहे. या दरम्यान पाकिस्तान संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक यांचे एक ट्विट चर्चेत आहे.
टी२० विश्वचषकात पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिलेल्या मॅथ्यू हेडन यांनी आपल्या माजी संघाबद्दल एक ट्विट केले आहे. उर्दूमध्ये त्यांनी लिहिले, ‘नमस्ते पाकिस्तान! मी ब्रिस्बेनमध्ये माझे आइसोलेशन पूर्ण करत आहे, परंतु माझे हृदय बांगलादेशमध्ये खेळत असलेल्या सर्व पाकिस्तानी खेळाडूंसोबत जोडले गेले आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. वेल डन बॉईज. पाकिस्तान जिंदाबाद.’
اسلام و علیکم پاکستان!
میں برسبین کے قرنطینہ سینٹر میں بیٹھا اپنی آئیسولیشن مکمل کر رہا ہوں مگر میرا دل ڈھاکہ میں موجود پاکستان کرکٹ ٹیم کے تمام کھلاڑیوں اور اسپورٹ اسٹاف کے ساتھ جڑا ہے.
میری تمام تر نیک تمنائیں پاکستان کرکٹ ٹیم کے ساتھ ہیں.
شاباش لڑکو! چھا جاؤ
پاکستان زندہ باد pic.twitter.com/SUUAueSbun— Matthew Hayden AM (@HaydosTweets) November 18, 2021
पाकिस्तानचे खेळाडू पटकन गोष्टी शिकतात
टी२० विश्वचषकादरम्यान एका मुलाखतीत हेडन म्हणाले होते की, पाकिस्तानी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रतिभेची कमतरता नाही. यासोबतच या संघाची धर्मावर नितांत श्रद्धा आहे. पाकिस्तान संघ खूप मोकळ्या मनाचा आहे. ते लवकरच गोष्टी शिकतात.
मोहम्मद रिझवान याने दिले होते कुराण
हेडन पुढे म्हणाले की, पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने मला कुराणचे इंग्रजी भाषांतर दिले होते. आम्ही अर्धा तास या पवित्र ग्रंथावर बोललो. आता मी दररोज कुराणचा काही भाग वाचतो. रिझवान माझ्या आवडत्या लोकांपैकी एक आहे, तो एक अद्भुत व्यक्ती आहे. बाबर आझम हा खूप चांगला खेळाडू आणि माणूस आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असूनही त्याला रोज काहीतरी शिकावेसे वाटते. हेडनने देखील कबूल केले की पाकिस्तानी खेळाडूंसोबत लॉकर रूममध्ये सहभागी होणे, हा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव होता.
पन्नास वर्षीय हेडनने ऑस्ट्रेलियासाठी १०३ कसोटी सामन्यांमध्ये ५०.७३ च्या सरासरीने ८६२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने ३० शतके आणि २९ अर्धशतके झळकावली. त्याच वेळी, हेडनच्या नावावर १६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३.८० च्या सरासरीने ६१३३ धावा आहेत. हेडनने एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतके आणि ३६ अर्धशतकेही केली आहेत. याशिवाय हेडनने ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत. हेडन चेन्नई सुपर किंग्सचा देखील एक भाग होता, त्यावेळी चेन्नईने २०१० च्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.