पाकिस्तान संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज उमर अकमल हा मागील काही काळापासून संघातून बाहेर आहे. त्याला संघात संधी मिळत नसली, तरीही तो त्याच्या वक्तव्यांमुळे भलताच चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने हे वक्तव्य भारतीय चाहत्यांविषयी केले आहे. अकमलने भारतीय चाहत्यांची प्रशंसा केली आहे. 32 वर्षीय अकमलने म्हटले आहे की, तो जेव्हाही भारतात खेळला आहे, तेव्हा त्याला आपल्याच देशात खेळल्यासारखे वाटले आहे.
उमर अकमल याचे भारतीय प्रेम
उमर अकमल (Umar Akmal) याने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भारतीय चाहत्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्याने म्हटले की, “ते पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आदर करायचे. भारतात खेळणे मला खूप चांगले वाटते. विशेषत: आशियात खेळणे खूप चांगले वाटते.”
‘भारत आणि आशियात खेळताना मजा येते’
त्याने पुढे बोलताना म्हटले की, “मी आतापर्यंत पाकिस्तानमध्ये घरगुती मालिकेत जास्त खेळलो नाहीये. मी फक्त 2 सामने खेळलो आहे. तेही टी20मध्ये. त्यातही मी अनलकी ठरलो. पहिल्या चेंडूवर बाद होत राहिलो. भारतात जेव्हा खेळतो, तेव्हा असे वाटते, जसे मी माझ्याच देशात खेळत आहे. प्रेक्षक खूप आदर करतात. विशेषत: पाकिस्तानी क्रिकेटपटूंना जास्त आदर मिळतो. तिथे (भारत आणि आशिया) खेळताना मजा येते.”
उमर अकमलची कारकीर्द
उमर अकमल याने पाकिस्तान क्रिकेट संघाकडून 16 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1003 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 121 वनडेत खेळताना 3194 धावा आणि 84 टी20 सामन्यात खेळताना 1690 धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानात फक्त 2 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याला भोपळाही फोडता आला नाहीये. तसेच, त्याने भारताविरुद्ध 6 टी20 आणि 2 वनडे सामने खेळले आहेत.
उमर अकमल शेवटच्या टी20त शून्यावर बाद
उमर अकमल याने न्यूझीलंडविरुद्ध 2009मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना झिम्बाब्वेविरुद्ध 2011मध्ये खेळला होता. अकमलने 2009मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तसेच, त्याने शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019मध्ये खेळला होता. याव्यतिरिक्त त्याने श्रीलंकेविरुद्ध 2009मध्ये टी20 पदार्पण केले होते आणि 2019मध्ये श्रीलंकेविरुद्धच शेवटचा टी20 सामना खेळला होता. या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला होता. (pakistani cricketer umar akmal on india read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी टी20 रँकिंगमध्ये सूर्याच बादशाह! नावावर केला आतापर्यंत कुठल्याही भारतीयाला न जमलेला रेकॉर्ड
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक