2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध सामना न खेळण्याची घोषणा केल्यानंतर आता तिथल्या एका प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्याने अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.
पाकिस्तानी युट्यूबर अरसलान नसीर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो म्हणतो, “तुमच्या मर्यादेत राहा. तुमचे ते 25 लोकांचे छोटेसे ऑफिस आहे, तिथे बसून शांतपणे यूट्यूब आणि नेटफ्लिक्स बघा. आयसीसीचे ऑफिस दुबईत आहे म्हणून ते सुरक्षित आहे. जर ते भारतात असते, तर आमच्या लोकांनी ते मुख्यालय आणि आसपासचा परिसर बॉम्बने उडवून दिला असता.
अरसलानने केवळ धमकीच दिली नाही, तर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केले आहे.
टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे. मात्र, स्पर्धा सुरू व्हायला अवघे 6 दिवस शिल्लक असताना पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिला आहे. या वादात केवळ पाकिस्तानच नाही, तर बांगलादेशने यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांचे सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती आयसीसीने फेटाळल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता.






