प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल(25 सप्टेंबर) सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण संघात १०७ वा सामना पार पडला. या सामन्यांत जयपूर पिंक पँथर्सने ४३-३४ असा विजय मिळवला. तसेच प्ले-ऑफच्या आशा कायम ठेवल्या. तर पुणेरी पलटण संघाच्या मात्र प्ले-ऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
पण असे असले तरी या सीजनमध्ये पुणेरी पलटणच्या युवा रेडर पंकज मोहितेने चांगलीच छाप सोडली आहे. हा पंकजचा प्रो कबड्डीतील पहिल्याच सीजन आहे. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सीजनमध्ये शानदार कामगिरी करताना या सीजनमधील पहिल्या १० रेडर्समध्ये झेप घेतली आहे.
अतिशय चपळ असलेल्या पंकजकडे खूप चांगले कबड्डी कौशल्य आहेत. पंकजची उडी आणि डुबकीने सर्वांना आकर्षित केले आहे.
काल झालेल्या सामन्यात पंकजने प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये १०० रेड पॉइंट्सचा पल्ला पार केला. त्यामुळे तो आता सीजन ७ मध्ये १६ सामन्यांत ११० रेड गुणांसह ९ व्या क्रमांकावर आला आहे.
प्रो कबड्डीत सीजन ७ मध्ये पदार्पण करणाऱ्या कबड्डीपटूंपैकी केवळ पंकजला या सीजनच्या पहिल्या १० रेडरमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे.
प्रो कबड्डीत सीजन ७ मध्ये आतापर्यंत १६ सामन्यांत पंकजने ११० रेड पॉइंट्स मिळवले आहेत. तर ३ सुपरटेनसह ४ सुपररेड पंकजच्या नावावर आहेत. तसेच त्याने एका सामन्यात सर्वाधिक १७ पॉइंट्स देखील मिळवले आहेत.
याबरोबरच पंकज प्रो कबड्डीच्या एका सीजन मध्ये १०० रेड पॉइंट्स मिळवणारा महाराष्ट्राचा सहावा खेळाडू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी काशीलिंग आडके, नितीन मदने, रिशांक देवडिगा, सिद्धार्थ देसाई आणि श्रीकांत जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली आहे.
सीजन ७ मध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर पवन शेरावत (२३२ गुण) आहे तर प्रदीप नरवाल (२२४ गुण) दुसऱ्या स्थानी आहे.
प्रो कबड्डी सीजन ७ साठी पुणेरी पलटण संघात करारबद्ध झालेला पंकजला सुरुवातीच्या काही सामन्यात अंतिम 7 मध्ये स्थान मिळाले नाही. तरीही बदली खेळाडू येऊन पंकजने आपली छाप सोडली. त्यानंतर पंकजने पुणेरी पलटण संघाच्या अंतिम 7 मध्ये आपली जागा मिळवली.
प्रो कबड्डीत एका सीजन मध्ये १०० पेक्षा अधिक रेड पॉइंट्स मिळवणारे महाराष्ट्राचे खेळाडू –
१) काशीलिंग आडके – ११३ पॉइंट्स (सीजन १), ११४ पॉइंट्स (सीजन २), ११४ पॉइंट्स (सीजन ५)
२) नितीन मदने – १०१ पॉइंट्स (सीजन १)
३) रिशांक देवडिगा – १०६ पॉइंट्स (सीजन ३), १६५ पॉइंट्स (सीजन ५), १०० पॉइंट्स (सीजन ६)
४) सिद्धार्थ देसाई – २१८ पॉइंट्स (सीजन ६), १५२* पॉइंट्स (सीजन ७)
५) श्रीकांत जाधव – १४१ पॉइंट्स (सीजन ६), १०३* पॉइंट्स (सीजन ७)
६) पंकज मोहिते – ११०* पॉइंट्स (सीजन ७)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अनुभवी तमिळ थलायवाज प्ले-ऑफमधून बाहेर, तर हे दोन संघ प्ले-ऑफसाठी ठरले पात्र
–मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर अलिबाग येथे संपन्न