जम्मू-काश्मीरचा अनुभवी फलंदाज पारस डोगरा यानं रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. शनिवारी (27 ऑक्टोबर) श्रीनगरमध्ये सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. या सामन्यात त्यानं 27 धावा केल्या. सामन्यात 21 धावा करताच त्यानं हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
पारस डोगरा यानं अमोल मजुमदारला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे. मजुमदारनं आपल्या रणजी ट्रॉफी कारकिर्दीत 9203 धावा केल्या. तर देवेंद्र बुंदेला (9202 धावा) आता तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. पारस डोगरानं रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 9210 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वसीम जाफर यांच्या नावे आहे, ज्यांनी 12038 धावा केल्या आहेत.
मूळचा हिमाचल प्रदेशचा असलेल्या पारस डोगरानं 2001 मध्ये रणजी पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 135 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9604 धावा केल्या आहेत. सक्रिय खेळाडूंमध्ये, डोगरा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकं (30) ठोकण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतकं ठोकणारा तो तिसरा फलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त वसीम जाफर (40 शतकं) आणि अजय शर्मा (31 शतकं) आहेत.
रणजी ट्रॉफीच्या या हंगामात डोगरा जम्मू-काश्मीरचं नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात संघानं सर्व्हिसेसविरुद्ध पहिला विजय मिळवला. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये जम्मू-काश्मीरला पराभव पत्कारावा लागला होता.
जम्मू-काश्मीर आणि सर्व्हिसेस यांच्यातील सामन्यात सर्व्हिसेसच्या संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना 71 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात, जम्मू-काश्मीरनं 228 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावातही सर्व्हिसेसच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. संपूर्ण संघ 132 धावांवर ऑलआऊट झाला आणि जम्मू-काश्मीरनं हा सामना एक डाव आणि 25 धावांनी जिंकला. युधवीर सिंग चरकला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हेही वाचा –
“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला
टीम इंडियाला मिळाला नवा रन मशीन, फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!
काय सांगता! 2024 मध्ये टीम इंडियानं एकही वनडे सामना जिंकला नाही, यापूर्वी फक्त एकदाच असं घडलं