प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाचा तीन दिवसीय लिलाव सध्या सुरु असून या लिलावाचा सोमवारी (३० ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. या लिलावादरम्यान ‘डुबकी किंग’ परदीप नरवालला तब्बल १ कोटी ६५ लाखांची बोली लागली आहे. त्यामुळे तो प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
त्याला युपी योद्धाने आपल्या संघात सामील केले आहे. लिलावादरम्यान परदीपला आपल्या संघात सामील करण्यासाठी तेलगु टायटन्स, बंगळुरु बुल्स आणि युपी योद्धा यांच्या स्पर्धा सुरु होती. अखेर युपी योद्धाने बाजी जिंकली आणि परदीपला आपल्या संघात सामील करुन घेतले. यावेळी पटना पायरेट्सकडे एफबीएम कार्ड वापरण्याची संधी होती. मात्र, त्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यामुळे परदीप आता युपी योद्धा या नव्या संघाकडून खेळताना दिसेल.
प्रो कबड्डीमध्यो ‘रेकॉर्ड ब्रेकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परदीपने लिलावातही मोठा विक्रम केला. तो प्रो कबड्डीमधील आजपर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याने मनू गोयतचा विक्रम मागे टाकला आहे. मनू गोयतला सहाव्या हंगामात १ कोटी ५१ लाख रुपयांची बोली लागली होती.
परदीपने आजपर्यंत प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक पाँइंट्स मिळवले आहेत. त्याने १०७ सामने खेळताना ११६९ पाँइंट्स मिळवले असून यात ११६० रेड पाँइंट्सचा समावेश आहे.
सिद्धार्थचीही बोली युपीने जिंकली मात्र…
सिद्धार्थ देसाई याची युपी योद्धाने १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत बोली जिंकली होती. मात्र, त्याचवेळी तेलगु टायटन्सने फार विचार न करता एफबीएम कार्डचा वापर केला आणि सिद्धार्थला १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत आपल्या संघात कायम केले. सिद्धार्थही प्रो कबड्डीच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरही तोच आहे. त्याला ७ व्या हंगामात तेलगुने १ कोटी ४५ लाखात संघात घेतले होते.
सोमवारी (३० ऑगस्ट) परदेशी खेळाडूंचे, तसेच भारताच्या अ गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये भारताच्या अ लिलावाच्या गटात चढाईपटूंच्या (रेडर्स) यादीत सिद्धार्थ आणि परदीप या दोघांचाही समावेश होता. त्यांची मुळ किंमत ३० लाख होती.
प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
१ कोटी ६५ लाख – परदीप नरवाल (युपी योद्धा, ८ वा हंगाम)
१ कोटी ५१ लाख – मोनू गोयत (हरियाणा स्टिलर्स, ६ वा हंगाम)
१ कोटी ४५ लाख – सिद्धार्थ देसाई (तेलगु टायटन्स, ७ वा हंगाम)
१ कोटी ३० लाख – सिद्धार्थ देसाई (तेलगु टायटन्स, ८ वा हंगाम)
१ कोटी २९ लाख – राहुल चौधरी (तेलगु टायटन्स, ६ वा हंगाम)
१ कोटी २० लाख – नितीन तोमर (पुणेरी पलटन, ७ वा हंगाम)