पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय बॉक्सर निशांत देवचं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पुरुष बॉक्सिंगच्या 71 किलो वजनी गटात निशांतचा सामना मेक्सिकोच्या मार्को वेरडेचा झाला. या सामन्यात त्याला 1-4 ने पराभव पत्कारावा लागला. निशांतनं उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला असता, तर त्याचं किमान कांस्यपदक जिंकणं निश्चित झालं असतं. पण पहिल्या फेरीत आघाडी घेतल्यानंतरही तो पराभूत झाला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्यपदकं जिंकली आहेत, जी सर्व नेमबाजीत आली आहेत.
निशांतनं पहिली फेरी सहज जिंकली. पहिल्या फेरीत पाच पैकी चार पंचांनी निशांतला 10-10 गुण दिले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत निशांत पूर्ण नियंत्रणात दिसला, जिथे त्यानं मेक्सिकन बॉक्सरवर अनेक मोठे जॅब हुक लावले, तरीही त्या फेरीत पंचांनी आश्चर्यकारकपणे वेरडेची बाजू घेतली. दुसऱ्या फेरीत फक्त दोन पंचांनी निशांतच्या बाजूनं 10-10 गुण दिले. तर तीन पंचांनी वेरेडच्या बाजूनं निकाल दिला.
यानंतर तिसऱ्या फेरीत निशांत देवला गती कायम राखता आली नाही. तिसऱ्या फेरीत पाचही पंचांनी वेरडे यांच्या बाजूनं निकाल दिला. तिसरी फेरी संपली तेव्हा निशांत देव खूपच आत्मविश्वासात दिसला. सामना जिंकल्याची त्याला पूर्ण खात्री होती, पण जो निर्णय आला तो आश्चर्यचकित करणारा होता. निशांत उपांत्यपूर्व फेरीत 1-4 असा पराभूत झाला होता. समालोचकांनाही या निर्णयाचं आश्चर्य वाटलं.
भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देणारा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग यानंही या सामन्यातील स्कोअरिंग सिस्टीम पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. विजेंदरनं ‘X’ वर लिहिलं, “मला स्कोअरिंग सिस्टम काय आहे हे माहित नाही, परंतु मला वाटतं की हा सामना खूप अटीतटीचा होता. तो (निशांत) खूप छान खेळला.” सामन्यानंतर सोशल मीडियावरही चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. निशांतला जाणीवपूर्वक पराभूत करण्यात आलं. तो जिंकण्यासाठी पात्र होता, असे चाहते बोलत आहेत.
हेही वाचा –
Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक
भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं
भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल