पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये अल्जेरियाची महिला बॉक्सर इमान खलीफ चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या महिला असण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता पॅरिसमधून आणखी एक असंच प्रकरण समोर आलंय.
वास्तविक, ऑलिम्पिकमधील आणखी एका महिला बॉक्सरवर ‘स्त्री’ असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही महिला बॉक्सर तैवानची असून तिचं नाव लिन यू टिंग आहे. लिन यू-टिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश करताच तिच्या महिला असण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इमान खलिफेप्रमाणेच लिन यू-टिंगवर 2023 च्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बंदी घालण्यात आली होती.
तैवानच्या लिन यू-टिंगनं उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवताच वाद सुरू झाला. बॉक्सिंगच्या 57 किलो वजनी गटात सहभागी लिन यू-टिंगनं उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बल्गेरियाच्या स्वेतलाना स्टेनेव्हाचा पराभव केला. या सामन्यात तैवानच्या बॉक्सरनं सहज विजय मिळवला. या विजयासह लिन यू-टिंगचं ऑलिम्पिक पदक निश्चित झालं आहे.
सामना हरल्यानंतर स्वेतलाना स्टेनेव्हा खूप संतप्त दिसली. ती पत्रकारांशीही बोलली नाही. मात्र, पराभवानंतर तिनं हातानं ‘X’ चिन्ह दाखवलं, ज्याद्वारे तिला शरीरातील क्रोमोसोमचं प्रतिनिधित्व करायचं होतं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, महिलांमध्ये ‘XX’ क्रोमोसोम असतात, तर पुरुषांमध्ये ‘XY’ क्रोमोसोम असतात. स्वेतलाना स्टेनेव्हाच्या प्रशिक्षकानं हातात एक कागद धरलेला होता, ज्यावर लिहिले होतं, “मी XX आहे. महिला खेळ वाचवा.”
विशेष म्हणजे अल्जेरियाच्या इमान खलीफनंही उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. खलीफनं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हंगेरीच्या लुका अन्ना हमोरीचा पराभव केला. खलीफनं या सामन्यात 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवला. आता ती 7 ऑगस्टला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा –
पंचाचा निर्णय चुकला? ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर अन्याय, स्टार डिफेंडर सेमीफायनलमधून बाहेर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॉक्सरसोबत चीटिंग झाली? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह