पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी जारी आहे. 7 सप्टेंबर (शनिवार) रोजी भारताच्या नवदीप सिंगनं पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तर महिलांच्या 200 मीटर (T12) स्पर्धेत भारताची ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट सिमरन शर्मानं कांस्यपदक पटकावलं. या दोन पदकांसह पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताची पदकसंख्या 29 वर पोहोचली आहे. भारतानं आतापर्यंत 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. पदकतालिकेत भारत सध्या 15व्या क्रमांकावर आहे.
अंतिम फेरीत नवदीप सिंगनं दुसऱ्या प्रयत्नात 47.32 मीटर थ्रो केला. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो होता. या स्पर्धेत इराणचा सदेघ सयाह बाईत (47.64 मी) अव्वल आला होता. मात्र स्पर्धा संपल्यानंतर तो अपात्र ठरला. त्यामुळे भारतीय खेळाडूला सुवर्णपदक मिळालं. चीनच्या पेंग्झियांग सननं (44.72 मीटर) रौप्यपदक जिंकलं. तर इराकच्या विल्डन नुखैलावीनं (40.46 मीटर) कांस्यपदक मिळवलं.
दुसरीकडे, महिलांच्या 200 मीटर (T12) स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरन शर्मानं 24.75 सेकंदात शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा एलियास ड्युरंडनं सुवर्णपदक पटकावलं. ओमारानं 23.62 सेकंदात शर्यत पूर्ण केली. व्हेनेझुएलाच्या पाओला अलेजांद्रा लोपेझ पेरेझला रौप्य पदक मिळालं. तिनं ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 24.19 सेकंद घेतले.
पॅरालिम्पिक खेळांमधील T12 श्रेणी दृष्टिहीन खेळाडूंसाठी असते. सिमरनचा अकाली जन्म झाला होता. त्यानंतर तिला पुढचे 10 आठवडे इनक्यूबेटरमध्ये घालवाले लागले होते, जिथे तिला दृष्टीदोष असल्याचं निदान झालं. सिमरनचे प्रशिक्षक तिचे पती गजेंद्र सिंह आहेत, जे आर्मी सर्व्हिस कॉर्प्समध्ये कार्यरत आहेत. ती नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेते. यापूर्वी सिमरनचे महिलांच्या 100 मीटर T12 फायनलमध्ये पदक थोडक्यात हुकले होते. चार खेळाडूंच्या अंतिम सामन्यात संथ सुरुवातीमुळे ती 12.31 सेकंदांचा वेळ घेत चौथ्या स्थानी राहिली होती.
हेही वाचा –
‘पीसीबीच्या अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून मुशीर खानची खेळी दाखवण्याची गरज’, दिग्गजाच्या कानपिचक्या
Ganesh Chaturthi Special : सचिन तेंडुलकरने जल्लोषात केले बाप्पाचे स्वागत, वॉर्नरनेही दिल्या शुभेच्छा
भर मैदानात पंतची कुलदीपसोबत मस्ती! हेल्मेट ओढले, टी शर्ट खेचला; काय काय केले?