पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या सातव्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर (बुधवार) रोजी भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी जारी आहे. आज पॅराथलीट सचिन सर्जेराव खिलारीनं आपल्या कामगिरीनं खळबळ उडवून दिली. सचिननं पुरुषांच्या शॉट पुटमध्ये (F46) रौप्य पदक जिंकलं. सध्याच्या पॅरालिम्पिकमधील भारताचं हे 21वं पदक आहे. भारतानं आतापर्यंत 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्य पदकं जिंकली आहेत.
अंतिम सामन्यात सचिन खिलारीनं दुसऱ्या प्रयत्नात 16.32 मीटर फेक केली. स्पर्धेचं सुवर्णपदक कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने पटकावलं. त्याचा सर्वोत्तम थ्रो 16.38 मीटर होता. तर क्रोएशियाच्या बाकोविक लुकानं (16.27 मीटर) कांस्यपदक जिंकलं.
सचिन खिलारीची अंतिम फेरीतील कामगिरी
पहिला थ्रो- 14.72 मीटर
दुसरा थ्रो- 16.32 मीटर
तिसरा थ्रो- 16.15 मीटर
चौथा थ्रो- 16.31 मीटर
पाचवा थ्रो- 16.03 मीटर
सहावा थ्रो – 15.95 मीटर
34 वर्षीय सचिन खिलारी हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे. वयाच्या नऊव्या वर्षी तो एका सायकल अपघातात जखमी झाला, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं. असं असूनही त्यानं इंजिनियरिंगच्या अभ्यासासोबतच खेळाची आवडही जोपासली. सुरुवातीला त्यानं भाला फेकण्यास सुरुवात केली. परंतु खांद्याच्या दुखापतीनंतर त्यानं शॉटपुटचा पर्याय निवडला. हा बदल त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारतानं 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकं अशी एकूण 19 पदकं जिंकली होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. मुरलीकांत पेटकर हे तेच खेळाडू आहेत, ज्यांच्या जीवनावर नुकताच ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
हेही वाचा –
‘प्रो कबड्डी लीग’च्या नव्या हंगामाची घोषणा, या तारखेपासून अनुभवता येणार थरार!
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
विनेश फोगट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीनं चर्चांना उधाण