भारतीय क्रिकेटपटू परवेझ रसूलवर जम्मू -काश्मीर क्रिकेट असोसिएशनने (जेकेसीए) पिच रोलर चोरल्याचा आरोप केला आहे. जेकेसीएने रसूलला पिच रोलर परत करण्यास सांगितले असून, तसे न केल्यास पोलिस कारवाईचा इशाराही दिला. रसूलने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
बीसीसीआयकडे मागितली मदत
परवेझ रसूलवर चोरीचा आरोप झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले. त्यानंतर आता रसूल याने आपल्याला त्रास दिला जात असून, यामध्ये बीसीसीआयने हस्तक्षेप करावा अशी इच्छा प्रकट केली. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा जम्मू-काश्मीरचा पहिला व एकमेव क्रिकेटपटू असलेल्या रसूलने हे आरोप पूर्णपणे फेटाळत, जेकेसीए अधिकाऱ्यांच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रसूलने दिली अशी प्रतिक्रिया
एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रसूल म्हणाला, “त्यांनी (जेकेसीए) सांगितले की पोलिस कारवाई केली जाईल. मी त्यांना मेलद्वारे, आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत का? तुम्ही माझा अपमान करण्यासाठी हे करत आहात का? असे प्रश्न विचारले आहेत. मला त्यांचा हेतू वेगळा असल्याचे दिसते.”
या प्रकरणानंतर जेकेसीएच्या एका अधिकाऱ्याने रसूलबाबत एक वादग्रस्त ट्विट केले होते. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतर या अधिकाऱ्याने ट्विट हटवले आहे.
अशी राहिली आहे कारकीर्द
रसूलने भारतासाठी एक वनडे आणि एक टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्याच्या नावावर ३ आंतरराष्ट्रीय बळी असून, त्याने आतापर्यंत प्रथमश्रेणी कारकिर्दीत २६६ बळी मिळवले आहेत. मागील सहा वर्षांपासून तो जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार म्हणून काम पाहतो. त्याने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला सलग दोन वर्ष बीसीसीआयचा सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून गौरवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगताय! अवघ्या १४ वर्षाच्या पोरानं ९८ चौकारांसह ठोकल्या होत्या तब्बल ५५६ धावा