मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (२१ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स ( सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर) यांच्या दरम्यान आयपीएल २०२१ मधील पंधरावा सामना खेळला गेला. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात सीएसकेने केकेआरला १८ धावांनी नमवत सलग तिसरा विजय संपादन केला. मात्र, आपल्या तुफानी फटकेबाजीने सामन्यात रंगत आणणाऱ्या पॅट कमिन्सने आपल्या खेळी दरम्यान एका आयपीएल विक्रमाला गवसणी घातली.
कमिन्सची तुफानी खेळी
चेन्नईने दिलेल्या २२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचे प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतले होते. त्यानंतर, आंद्रे रसेल ५४ धावांची स्फोटक खेळी खेळून बाद झाला. सामना केकेआरच्या हातून गेला असे वाटत असताना, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पॅट कमिन्सने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत ३४ चेंडूत ४ चौकार व ६ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी केली. अखेरचे दोन फलंदाज धावबाद झाल्याने केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला.
कमिन्सचा आयपीएल विक्रम
पॅट कमिन्सने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केलेली ६६ धावांची खेळी आयपीएलच्या इतिहासात आठव्या क्रमांकाचा फलंदाजाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी हा विक्रम हरभजन सिंगच्या नावे होता. हरभजनने २०१५ मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध ही खेळी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर क्रिस मॉरिस असून त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना ५२ धावांची नाबाद खेळी केली होती.
चेन्नईची अव्वलस्थानी झेप
सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ६४ आणि फाफ डू प्लेसीसच्या नाबाद ९५ धावांच्या जोरावर चेन्नईने २० षटकात २२० अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, वेगवान गोलंदाज दीपक चाहरने पहिल्या ५ षटकात ४ बळी मिळवून केकेआरची अवस्था पाच बाद ३१ अशी केली होती.
मात्र, त्यानंतर आंद्रे रसेलने २२ चेंडूत ५४ आणि पॅट कमिन्सने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावा बनवून सामना रंगतदार बनविला. मात्र, तो संघाला विजयी करू शकला नाही. चेन्नईने कोलकाताला १९.१ षटकात २०२ धावांवर सर्वबाद करत १८ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर सीएसके सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण
KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव