जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. कोरोना या साथीच्या आजारामुळे आयपीएलचा हा हंगाम विना प्रेक्षक आणि बायो-बबलमध्ये भारतातील सहा शहरांमध्ये खेळला जात होता.
अचानकपणे काही खेळाडू व कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या मायदेशी परत येण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागला. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स हा घरी पोहोचल्यानंतर आपल्या होणाऱ्या पत्नीला पाहताच भावूक झाला. याबाबतचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बसला मोठा फटका
ज्यावेळी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय झाला त्याच्या काही दिवस आधीच ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांना बंदी घातली होती. या कारणाने आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम मालदीवमध्ये आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर सिडनीमध्ये १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व खेळाडू सोमवारी (३१ मे) पहाटे आपापल्या घरी रवाना झाले.
पॅट कमिन्स झाला भावूक
आयपीएलनंतर जवळपास २५ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार व आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा पॅट कमिन्स घरी पोहोचला. त्यानंतर त्याने आपली गर्भवती प्रेयसी बेकी बोस्टन हिला मिठी मारली. याप्रसंगी, कमिन्स अत्यंत भावूक झालेला दिसत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकार क्लो अमांडा बेली यांनी ट्विट केला आहे. त्यांनी एक ट्विटला, ‘दिवसातील सर्वोत्तम व्हिडिओ, आठ आठवडे दूर राहिल्यानंतर पॅट कमिन्स आपली पार्टनर बेकी बोस्टन हिला भेटला. या सर्व भावना!’
Video of the day! After eight weeks away for the IPL, Pat Cummins finally leaves hotel quarantine and reunites with his pregnant partner Becky. All the feels! pic.twitter.com/YA3j98zJId
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) May 31, 2021
फलंदाजीत चमकला कमिन्स
आयपीएलमध्ये केकेआरचे प्रतिनिधित्व करणारा कमिन्स प्रमुख गोलंदाज म्हणून सहभागी झाला होता. मात्र, आपल्या गोलंदाजीपेक्षा त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध केलेल्या फटकेबाजीने सर्वांचे मन जिंकले. त्यानंतर, भारत सरकारला कोरणा विरुद्धचा लढाईसाठी आर्थिक मदत करत त्याने सर्व खेळाडूंसाठी एक आदर्श घालून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
सात वर्षांपूर्वी रैनाने एकाच षटकात ७ वेळा चेंडूला केले होते सीमापार, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर
‘या’ कारणामुळे जडेजा अन्य खेळाडूंपेक्षा क्षेत्ररक्षणात आहे सरस, स्वत:च केलाय खुलासा
वेलकम होम डॅडी! वॉर्नरच्या लाडक्या लेकींनी जवळपास २ महिन्यांनी भेटलेल्या ‘बाबा’चे केले खास स्वागत