भारत आणि न्यूझीलंड मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनच्या द रोस बाऊल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्या संदर्भात क्रिकेटचे अनेक पंडित वेगवेगळी भविष्यवाणी करत आहेत.आता यात ऑस्ट्रेलियन दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचीही भर पडली असून त्याने अंतिम सामन्यात आघाडीवर असलेल्या संघाचे नाव जाहीर केले आहे.
पॅट कमिन्सने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे म्हंटले आहे. न्यूझीलंडच्या संघासाठी परिस्थिती अनुकूल असेल आणि त्यामुळे त्यांचे पारडे या सामन्यात जड असल्याचे कमिन्सला वाटते.
पॅट कमिन्सने म्हटले आहे की, “हा अतिशय शानदार सामना होणार आहे. मी बातम्यांमध्ये जे पाहिले त्यानुसार इंग्लंडमध्ये खूप पाऊस पडणार आहे. हे वातावरण न्यूझीलंडच्या बाजूने राहील. गेली काही महिने कोणत्याच संघाने कसोटी सामने खेळलेले नाहीत. म्हणूनच दोन्ही संघासाठी हा सामना सोपा असणार नाही. सामन्यात काहीही घडू शकते, पण भारतापेक्षा इंग्लंड मधील वातावरणामुळे न्यूझीलंडला अधिक मदत होईल. ”
पॅट कमिन्स हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 14 कसोटी सामन्यात 70 बळी घेतलेले आहेत. आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बोलताना कमिन्स म्हणाला, “कोरोनामुळे या स्पर्धेत समस्या आली, परंतु मी या कसोटी स्पर्धेचा आनंद लुटला. यात प्रत्येक मालिका खूप महत्वाची ठरली. मला स्पर्धेचे स्वरूप खूप आवडले. दुर्दैवाने आम्ही दक्षिण आफ्रिके विरुद्धची मालिका खेळू शकलो नाही. त्यामुळे अंतिम सामना खेळण्याची आमची संधी गेली. ”
कमिन्स प्रमाणेच अनेक क्रिकेट पंडितांनी न्यूझीलंडने पारडे जड असल्याचे मत मांडले आहे, मात्र भारतीय संघ देखील सध्या शानदार फॉर्म मध्ये आहे. भारतीय समर्थकांना आशा असेल की विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ शानदार कामगिरी करत पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर आपले नाव कोरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक २०२३ मध्ये कोण असेल भारतीय संघाचा फिनिशर? या खेळाडूंचा आहे पर्याय
इंग्लंड दौऱ्यावर यशस्वी होण्यासाठी विश्वविजेत्या कर्णधाराने रिषभ पंतला दिला हा कानमंत्र
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा