भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चालू असलेली टी२० मालिका अतिशय रोमांचक घडीवर आली आहे. उभय संघांनी जबरदस्त प्रदर्शन करत मालिका २-२ ने बरोबरीवर आणली आहे. त्यामुळे शनिवार रोजी (२० मार्च) अहमदाबाद येथे होणारा पाचवा टी२० सामना निर्णायक ठरणार आहे. तत्पुर्वी पाहुण्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनी आगामी टी२० विश्वचषकाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी२० विश्वचषक २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड संघ सध्या चालू असलेल्या टी२० मालिकेद्वारे या विश्वचषकाची तयारी करत आहेत. मात्र इंग्लंडचा टी२० संघ आताच येत्या टी२० विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार असून त्यांच्या मागील काही वर्षांतील प्रदर्शनाला पाहता मोठमोठे संघही त्यांचा सामना करायला घाबरतील, असे कॉलिंगवूड यांचे म्हणणे आहे.
ब्रिटिश मीडियाशी संवाद साधताना कॉलिंगवूड म्हणाले की, “मागील चार वर्षात इंग्लंड संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे. त्यामुळे त्यांचे प्रदर्शन पाहता कित्येक संघ टी२० विश्वचषक २०२१ मध्ये आमचा सामना करायला थरथरतील. आमच्या संघात अकराव्या क्रमांकापर्यंत मॅच विनिंग खेळाडू उपलब्ध आहेत, जे त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर संघाला एकहाती विजय मिळवून देऊ शकतात. हा संघ २०१० च्या संघापासून खूप वेगळा आहे. मला नाही वाटत की, आमचा संघ यापेक्षा अजून चांगल्या स्थितीत असू शकतो.”
“साल २०१० मध्ये अंतिम क्षणाला आमचा संघ लयीत आला होता. आम्ही काही धाडसी निर्णय घेत संघबांधणी केली होती. आम्हाला माहिती आहे की, आम्हाला कशाप्रकारचे प्रदर्शन करायचे आहे. आम्ही खेळाडूंना आक्रमक फलंदाजी करण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे आम्ही टी२० विश्वचषक २०२१ साठी पूर्णपणे सज्ज आहोत,” असे पुढे कॉलिंगवूड यांनी सांगितले.
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी२० सामन्याविषयी बोलताना कॉलिंगवूड म्हणाले की, “या दबावातील सामन्यामुळे विश्वचषकासाठी आमच्या संघाला खूप मदत मिळणार आहे. ही दोन्ही संघांसाठी खूप मोठी लढत असणार आहे. या सामन्यामुळे आम्हाला बाद फेरीतील सामन्याचा अनुभव मिळणार आहे. हा सामना आमच्यासाठी विश्वचषकातील अंतिम सामन्याप्रमाणे असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार-इशानच्या आंतरराष्ट्रीय यशामध्ये ‘याचे’ मोठे योगदान; मास्टर ब्लास्टरचे महत्त्वपुर्ण विधान
भारत-इंग्लंडमध्ये चुरशीची लढत; फ्लॉप राहुल का अनुभवी धवन, कोणाला आजमावणार टीम इंडिया?
आर्चर पुढे असताना पहिल्याच चेंडूवर षटकार, इतकी हिम्मत कुठून आली? सूर्यकुमार म्हणतो…






