पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत एलीमिनेटर १ लढतीत सिध्दार्थ म्हात्रे(६४धावा) याने केलेल्या झंझावती अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ३२धावांनी पराभव करत एलीमिनेटर २लढतीत प्रवेश केला. आज २१ जून २०२४ रोजी एलीमिनेटर २लढतीत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघापुढे ईगल नाशिक टायटन्स संघाचे आव्हान असणार आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने २०षटकात सर्वबाद १७३धावा केल्या. वरच्या फळीतील फलंदाज अंकित बावणे(२२), राहुल त्रिपाठी(१६), हर्ष संघवी(११) हे फारशी मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यामुळे पीबीजी कोल्हापूर टस्कर्स ४ बाद ५४ अशा स्थितीत होता. त्यानंतर सिध्दार्थ म्हात्रेने ३६चेंडूत ६४धावांची आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ३चौकार व ४षटकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. सिध्दार्थ व अनिकेत पोरवाल (११धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी ३८चेंडूत ६० धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यावर श्रीकांत मुंढे (२४धावा), योगेश डोंगरे(१०धावा)यांनी धावा काढून संघाचा धावगती वाढवली. छत्रपती संभाजी किंग्सकडून राजवर्धन हंगर्गेकर ४-२९, यतीन मंगवाणी(२-४४), हितेश वाळुंज(१-३४) यांनी सुरेख गोलंदाजी करत कोल्हापूर टस्कर्स संघाला १७३धावांवर रोखले.
या आव्हानाचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्स संघाला २०षटकात ८बाद १४१धावा च करता आल्या.
सलामीचे फलंदाज ओम भोसले(१), मुर्तझा ट्रंकवाला (१) हे स्वस्तात तंबूत परतले. कोल्हापूरच्या निहाल तुसामतने ओम भोसलेला त्रिफळा बाद, मुर्तझा ट्रंकवाला ला झेल बाद केले. त्यानंतर ओमकार खाटपे ने ४४चेंडूत ४३धावांची संयमी खेळी केली. त्याने २चौकार व षटकार मारला. ओमकार व दिग्विजय पाटील यांनी चौथ्या विकेटसाठी ३८चेंडूत ४४धावांची भागीदारी केली. दिग्विजय पाटीलने २२चेंडूत ५चौकारासह ३४धावा केल्या. फिरकीपटू अथर्व डाकवेने दिग्विजय पाटीलला झेल बाद करून धावगतीला ब्रेक लावला. एकाबाजूने विकेट असताना ओमकार खाटपेने दिलेली लढत अपुरी ठरली. कोल्हापूर टस्कर्सकडून अथर्व डाकवे(३-२२), निहाल तुसामत(२-२५), उमर शहा(१-२२)यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स: २०षटकात सर्वबाद १७३धावा(सिध्दार्थ म्हात्रे ६४(३६,३×४,४×६), श्रीकांत मुंढे २४, अंकित बावणे २२, राहुल त्रिपाठी १६, हर्ष संघवी ११, अनिकेत पोरवाल ११, राजवर्धन हंगर्गेकर ४-२९, यतीन मंगवाणी २-४४, हितेश वाळुंज १-३४) वि.वि.छत्रपती संभाजी किंग्स: २०षटकात ८बाद १४१धावा(ओमकार खाटपे ४३(४४, २×४,१×६), दिग्विजय पाटील ३४(२२, ५×४), सौरभ नवले १५, अथर्व डाकवे ३-२२, निहाल तुसामत २-२५, उमर शहा १-२२); सामनावीर – सिध्दार्थ म्हात्रे