पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत बाराव्या दिवशी पहिल्या लढतीत लेग स्पिनर श्रेयस चव्हाण(५-१८)याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह अंकित बावणे(नाबाद ७०)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर टस्कर्सच्या श्रेयस चव्हाण याने केलेल्या भेदक माऱ्यापुढे पुणेरी बाप्पा संघाला २०षटकात ८बाद १३५धावाच करता आल्या. श्रेयसने १८ धावात ५ गडी बाद करून एमपीएलमधील यावर्षातील नवा विक्रम नोंदवला. याआधी गतवर्षी कोल्हापूरच्याच मनोज यादवने इग्लन नाशिक टायटन्स विरुद्धच्या लढतीत हॅट्रिक कामगिरीसह ६ धावात ५ गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला होता. पुणेरी बाप्पा संघाची डावाची सुरुवात खराब झाली. यश क्षीरसागर(०) खाते न उघडताच धावबाद झाला. पवन शहाने ३चौकार व १ षटकार लगावत २५धावा केल्या. आघाडीचे फलंदाज अभिमन्यू जाधव(१), ऋतुराज गायकवाड(१) हे एकापाठोपाठ बाद झाले. राहुल दामले(३८धावा, ३चौकार व १षटकार) व साहिल औताडे(२६धावा) या जोडीने धावा काढून धावगती वाढवली. त्यानंतर सुरज शिंदेने १६चेंडूत नाबाद ३५धावांची आक्रमक खेळी करून धावफलक हलता ठेवला. त्यात त्याने ५चौकार व १ षटकार मारला.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला विजयासाठी १३५धावांचे होते. सलामवीर अनिकेत पोरवाल ९ धावांवर तंबूत परतला. सचिन भोसलेने त्याला झेल बाद केले. त्यानंतर कर्णधार राहुल त्रिपाठी व अंकित बावणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५चेंडूत ७७ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार राहुल त्रिपाठीने २१चेंडूत ४२ धावा फटकावल्या. राहुलने ४चौकार व ३षटकार मारले. सोहम जमालेने राहुल त्रिपाठीला बाद करून अडसर दूर केला. त्यानंतर अंकित बावणेने एकाबाजूने भक्कम खेळी करताना ५४चेंडूत ७० धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंकितने आपल्या खेळीत ८चौकार व १ षटकार खेचला. कोल्हापूर संघाने हे आव्हान १४.४ षटकात २बाद १३६ धावा काढून पूर्ण केले. या विजयामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाने ३विजयांसह गुणतालिकेत ५व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक:
४एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ८बाद १३५धावा(रोहन दामले ३८(४१,३x४,१x६), सुरज शिंदे नाबाद ३५(१६,५x४,१x६), साहिल औताडे २६, पवन शहा २५, श्रेयस चव्हाण ५-१८, यश खळदकर १-१७) पराभुत वि.पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: १४.४षटकात २बाद १३६धावा(अंकित बावणे नाबाद ७०(५४, ८x४,१x६), राहुल त्रिपाठी ४२(२१,४x४,३x६), सचिन भोसले १-२१, सोहम जमाले १-३८); सामनावीर – श्रेयस चव्हाण.