दुबई येथे इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यादरम्यान खेळला गेला. या सामन्यात पंजाबने चेन्नईला सहा गडी राखून पराभव करत प्ले ऑफसाठी पात्र होण्याच्या आपल्या संधी जागृत ठेवल्या. या सामन्यात पंजाबने विजय मिळवत चेन्नईविरुद्ध आपली यशाची परंपरा कायम राखली.
चेन्नईचा सलग दुसरा पराभव
या पूर्वीच प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या चेन्नईने या सामन्यात प्रथम स्थान पटकावण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. सलामीवीर फाफ डू प्लेसिसने ७६ धावांची शानदार खेळी केली. त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने चेन्नईचा डाव ६ बाद १३४ धावांवर मर्यादित राहिला. पंजाबसाठी अर्शदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन बळी आपल्या नावावर केले.
या तुटपुंज्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एक स्फोटक खेळी करत सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्याने ४२ चेंडूत ७ सणसणीत चौकार व ८ गगनचुंबी षटकार ठोकत ९८ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने केवळ १३ षटकात हे आव्हान पार केले. केएल राहुल सामन्याचा मानकरी ठरला.
चेन्नईविरुद्ध दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे पंजाब
या विजयासह चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत पंजाब दुसऱ्या स्थानी आला आहे. चेन्नई व पंजाब यांच्यादरम्यान आतापर्यंत २५ सामने खेळले गेले असून, यापैकी १५ सामने चेन्नईने जिंकले असून, पंजाबला १० सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. यापैकी एक विजय सुपर ओव्हरमध्ये मिळवला गेलेला. चेन्नईविरुद्ध सर्वाधिक १९ विजय मुंबईने मिळवले असून, दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स यांनी देखील प्रत्येकी १० सामन्यात चेन्नईला पराभूत केले आहे.