आज (२१ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) सामना रंगणार आहे. यातील पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे झाला. या सामन्यात हैदराबादने ९ विकेट्सने विजय मिळवत या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
या सामन्यात पंजाबने हैदराबादला १२१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने केवळ १ विकेट गमावत १८.४ षटकात पूर्ण केला.
हैदराबादकडून सलामीला डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी ७३ धावांची भागीदारी केली होती. त्यांच्या या भागीदारीने हैदराबादने विजयाचा पाया रचला. पण ही भागीदारी तोडण्यात फॅबियन ऍलेनला यश मिळाले. त्याने वॉर्नरला ३७ धावांवर बाद केले. पण यानंतर बेअरस्टोला केन विलियम्सनने भक्कम साथ देत आणखी विकेट जाऊ दिल्या नाही. दरम्यान, बेअरस्टोने अर्धशतकही पूर्ण केले.
अखेर बेअरस्टो आणि विलियम्सनने ४८ धावांची नाबाद भागीदारी करत १९ व्या षटकात हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बेअरस्टो ५६ चेंडूत ६३ धावा करत नाबाद राहिला. तर विलियम्सन १९ चेंडूत १६ धावा करुन नाबाद राहिला.
पंजाबचे हैदराबादला १२१ धावांचे आव्हान
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांना सुरुवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळे त्यांना २० षटकात सर्वबाद १२० धावा करता आल्या. त्यांनी हैदराबादला १२१ धावांचे आव्हान दिले.
पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अगरवालने डावाची सुरुवात केली. मात्र, चौथ्याच षटकात ४ धावांवर कर्णधार केएल राहुल भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर केदार जाधवकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर ७ व्या षटकात खलील अहमदने मयंकला २२ धावांवर बाद केले. पुढेही निकोलस पूरन आणि ख्रिस गेलला पंजाबचा डाव सावरता आला नाही.
डावाच्या ८ व्या षटकात निकोलस पूरन शुन्यावर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. विशेष म्हणजे त्याने एकही चेंडू खेळला नव्हता. त्याच्यापाठोपाठ ९ व्या षटकात ख्रिस गेल १५ धावा करुन राशिद खानविरुद्ध खेळताना पायचीत झाला. त्यानंतर मोझेल हेन्रीक्स आणि दीपक हुडा डाव सावरतील असे वाटत असतानाच १२ व्या षटकात हुडा तर १४ व्या षटकात हेन्रीक्स अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर अनुक्रमे १३ आणि १४ धावांवर बाद झाले.
यानंतर शाहरुख खानने एक बाजू सांभाळत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने फॅबिएन ऍलेन १७ व्या षटकात ६ धावांवर खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर १९ व्या षटकात शाहरुखही २२ धावा करुन खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेरच्या षटकात मुरुगन अश्विन आणि मोहम्मद शमी देखील बाद झाले. त्यामुळे पंजाबचा डाव १२० धावांवर संपुष्टात आला.
हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अभिषेक शर्माने २ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पंजाबने जिंकली नाणेफेक
या सामन्यापूर्वी उभय संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल पंजाब संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
याबरोबर पंजाब आणि हैदराबाद संघाने अंतिम ११ जणांचे संघही जाहीर केले. हैदराबाद संघात मनिष पांडेला डच्चू देत सिद्धार्थ कौलला स्थान देण्यात आले. याबरोबरच अब्दुल समदच्या जागी केदार जाधवला संधी देण्यात आली. एवढेच नव्हे तर, दुखापतीतून सावरलेला केन विलियम्सन याचेही संघात पुनरागमन झाले.
दुसरीकडे पंजाब संघात ३ बदल करण्यात आले. झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ आणि जलज सक्सेना यांना बाहेर करत फिन ऍलेन मोसेस हेन्रिक्स आणि मुर्गन अश्विनला सहभागी करण्यात आले.
#PBKS have won the toss and will bat first against #SRH.
Follow the game here – https://t.co/PsUV2KPwvf #VIVOIPL pic.twitter.com/qBVvr4n7wB
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ
पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, फॅबियन ऍलेन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, विराट सिंग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल