आयसीसीनं अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला ग्रीन सिग्नल दिलेला नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चिंतेचं वातावरण आहे. बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन रझा नकवी हे पाकिस्तान सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. आता त्यांनी या स्पर्धेसाठी भारतीय चाहते पाकिस्तानात यावे, यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. नकवी यांनी आश्वासन दिलं की, भारतीय चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद लुटण्यासाठी पाकिस्तानात यायचं असेल तर त्यांना व्हिसाशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही.
मोहसीन रझा नकवी यांनी अलीकडेच काही शीख यात्रेकरूंची भेट घेतली. त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत भारतीय चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. पाकिस्तानी मीडिया एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार नकवी म्हणाले, “आम्ही भारतीय चाहत्यांसाठी एक विशेष कोटा तयार करू आणि त्यांना व्हिसा लवकर मिळेल याची खात्री करू.”
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळली जाणार आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळली जाईल. आयसीसीची ही महत्त्वाची स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असली तरी, टीम इंडिया पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवायचा की नाही हे भारत सरकारवर अवलंबून आहे. यामध्ये बीसीसीआयची कोणतीही भूमिका असणार नाही. बोर्ड भारत सरकारच्या निर्णयाचं पालन करेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकही क्रिकेट सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात गेलेला नाही. 2007 नंतर दोन देशांदरम्यान एकही कसोटी मालिका खेळली गेली नाही. पीसीबी भारतासाठी स्पर्धेचं हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार नाही. परंतु जर भारतानं शेवटपर्यंत आपली भूमिका बदलली नाही, तर पाकिस्तानला हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास भाग पाडलं जाऊ शकतं.
हेही वाचा –
गुजरातनं रिटेन केलेल्या खेळाडूचं ऑस्ट्रेलियात शतक! लवकरच मिळू शकते कसोटीत संधी
केकेआरच्या रिटेंशन यादीत पहिल्या क्रमांकावर होतं श्रेयसचं नाव, पण…; वेंकी मैसूरने सांगितलं सर्वकाही
लखपतींचे बनले करोडपती…! कोहली किंवा क्लासेन नाही आयपीएल रिटेंशनमध्ये ‘या’ खेळाडूंची चांदी