पुणे। समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेला १०० वर्षापेक्षा मोठी परंपरा असून महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल यामध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शिवशंभो स्टेडीयम फुरसुंगी येथे या निकाली कुस्त्या रंगणार आहेत, अशी माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेतील विजेत्या मल्लांना एकूण ३० लाखाची रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पंजाबचा हिंदकेसरी पै. रुबल विरुद्ध भारत केसरी रुस्तम ए हिंद पै.हितेश कुमार यांची कुस्ती विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय भारत केसरी पै. सोमवीर विरुद्ध वस्ताद सतपाल यांचा पठ्ठा सत्येंद्र कुमार, महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख विरुद्ध पुण्याचा गणेश जगताप, माऊली जमदाडे विरुद्ध शिवराज राक्षे, साईनाथ रानवडे विरुद्ध निलेश लोखंडे, मुन्ना झुंझुरके विरुद्ध कौतुक डाफळे या नामवंत मल्लांच्या कुस्त्या यामध्ये होणार आहेत. या कुस्त्यांमधील विजेत्या पैलवानाला चांदीची गदा बक्षिस म्हणून दिली जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. यानिमित्ताने देशातील तगडया मल्लांचे मल्लयुद्ध अनुभविण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार आहे. नामवंत मल्लांच्या एकूण ६५ कुस्त्या यावेळी होणार आहेत. यामध्ये हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया युनिर्व्हसिटी चॅम्पियन तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यांतील वादळ निर्माण करणा-या मल्लांच्या कुस्त्या होतील. तरी कुस्तीप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.