गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात ज्युडोच्या खेळाडूंनी देखील शनिवारी महाराष्ट्राच्या पदकांमध्ये आपला वाटा उचलला. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात परिज्ञा कस्तुरे हिने ५२ किलो वजन प्रकारात रौप्य, तर याच वजन प्रकारात अश्विनी सोळंकी हिने रेपीचेजमधून ब्रॉंझपदकाची कमाई केली.
परिज्ञा हिने पहिल्या फेरीत पुड्डुचेरीच्या डी. सरोश्नी, आसामच्या शीतल, मणिपूरच्या एल. देवी यांना हरवून अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकाच्या लढतीत तिला दिल्लीच्या तनिश्या टोकस हिच्याकडून गुणांवर पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर अश्विनीने जम्मू कश्मिरच्या टी कप्टा हिला रेपीचेजमधून हरवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. त्यापूर्वी तिने पहिल्या फेरीत मणिपूरच्या हेईश्नाम देवीचा पराभव केला. केरळच्या अतिथकुमार अनिशा हिचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मात्र, तिलाही दिल्लीच्या तनिश्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, तिला यामुळे रेपीचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
व्हॉलिबॉलमध्ये विजयी सलामी
मुलींच्या २१ वर्षांखालील महाराष्ट्र संघाने विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीत त्यांनी यजमान आसामचा २५-६, २५-८, २५-५ असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जोरदार स्मशिंग व भक्कम बचाव याचा सुरेख प्रत्यय घडविला. त्यांच्या उत्कृष्ट सांघिक खेळापुढे आसामचे आव्हान फिके ठरले.
टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राची धडाक्यात सुरवात
महाराष्ट्राच्या मुला, मुलींनी टेबल टेनिसमध्ये झकास सुरवात केली. राज्याच्या बहुतेक खेळाडूंनी विजय मिळविले. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात स्वस्तिका घोष, दिया चितळे, समृदद्धि चितळे, , मुलांच्या गटात हृषिकेश मल्होत्रा यांनी विजयी सलामी दिली.
निकाल-
मुली-
१७ वर्षांखालील – स्वस्तिका घोष वि.वि. अनर्ग्या मंजुनाथ ११-५, ११-८, ११-५,
दिया चितळे वि.वि. एल. नारंग (दिल्ली) ११-३, ११-५, ११-८,
समृद्धि चितळे वि.वि. अनष्का बसाक (प. बंगाल) ११-५, ११-६, ६-११, ८-११, १२-१०.
मुले-
हृषिकेश मल्होत्रा वि.वि. विश्वदिनदयालन ११-५, ३-११, १५-१३, २१
वर्षांखालील -अनन्या बसाक वि.वि. कनमानी राव ११-७, १३-११, ११-१,
सृष्टी हेलंगडी वि.वि. मौमिता दत्ता (प. बंगाल) ११-३, ११-८, ११-८.