गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी देखील महाराष्ट्राची पदकांची कमाई कायम राहिली. टेनिसमध्ये स्नेहल माने – मिहिका यादव यांनी २१ वर्षांखालील गटात दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली.
अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी तेलंगणाच्या समा सत्विका –
श्राव्या चिलाक्लापुडी यांचा ६-३, १०-७ असा पराभव केला. याच वयोगटात मुलांच्या विभागात दक्ष अग्रवाल-यशराज दळवी यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांना हरियानाच्या ध्रुवन हुडा – चिराग किशन जोडीकडून १-६, ७-१० असा पराभव पत्करावा लागला. याच विभागात महाराष्ट्राची अंशुल सातव-साहेब सोधी ही जोडी ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटात एकेरीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरे हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत कर्नाटकाच्या रेश्मा मारुती हिने आकांक्षाचा ६-४, ७-५ असा पराभव केला. मुलांच्या २१ वर्षांखालील गटातही महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तमिळनाडूच्या सुरेश दक्षिणेश्वर याने महाराष्ट्राच्या ध्रुव सुनिशचा ६-३, ६-२ असा पराभव केला.
जलतरणात करिनाची सोनेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या करिना शांता हिने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात २०० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकून स्पर्धेतील अखेरच्या दिवशाची सोनेरी सांगता केली. महाराष्ट्राच्या वेदांत बापना व एरॉन फर्नान्डिस यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
मुंबईच्या करिनाने २०० मीटर्सचे अंतर २ मिनिटे ४२.९७ सेकंदांत पार केले. महाराष्ट्राच्याच अनुष्का पाटील (२ मिनिटे ४४.१३ सेकंद) व झारा जब्बार (२ मिनिटे ४७.७८ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकावित वर्चस्व गाजविले.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या वेदांत बापना याने ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक मिळविताना २७.६६ सेकंद वेळ नोंदविली. २१ वर्षाखालील गटात एरॉन फर्नान्डिसने १०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदकावर नाव कोरले. त्याला हे अंतर पार करण्यास ५३.०२ सेकंद वेळ लागला.
वेटलिफ्टिंगमध्ये स्नेहल भोंगाळेला सुवर्ण
महाराष्ट्राच्या स्नेहल भोंगाळे हिने कनिष्ठ मुलींच्या ८७ किलोवरील गटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. तिने स्नॅचमध्ये ६५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९३ किलो असे एकूण १५८ किलो वजन उचलले. ती कुरुंदवाड येथील हर्क्युलस अकादमीत सराव करते. महाराष्ट्राच्याच प्रीति देशमुख हिने युवा विभागाच्या ८१ किलो गटात रौप्यपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये ६९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८२ किलो असे एकूण १५१ किलो वजन उचलले.
बॉक्सिंगमध्ये भावेशला रौप्य
बॉक्सिंगमध्ये २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा भावेश कट्टिमणी रौप्यपदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील ५२ किलो वजन प्रकारात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भावेशला दिल्लीच्या रोहित मोरकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्राचे फुटबॉलचे पदक हुकले
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचे फुटबॉलचे पदक हुकले. ब्रॉंझपदकाच्या लढतीत महाराष्ट्राला गोव्याकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. गोव्याकडून कुमार साळगांवकरने दोन, तर जोस्टन कार्डोजने एक गोल केला. महाराष्ट्राचा एकमेव गोल पेनल्टी किकवर अमोल गायकवाड याने केला.