गुवाहाटी । अभ्यास आणि अभ्यासात गर्क राहणारी दिशा पाटील कधी खेळाकडे आणि ते देखिल बॉक्सिंगकडे वळेल असे तिच्या आई वडिलांना काय, पण तिलाही वाटले नव्हते. पण, फोगट बहिणींवर आलेल्या दंगल चित्रपटाने तिचा दृष्टिकोनच बदलला. मुलींनी का खेळू नये या विचाराने ती झपाटली गेली आणि ती खेळातही नाव कमाविण्याच्या धेय्याने झपाटली गेली.
दंगलची कथा फोगट बहिणींच्या कुस्ती कारकिर्दीवर अवलंबून होती. जळगावच्या दिशाने कुस्तीचा विचार केला, पण ती बॉक्सिंगकडे ओढली गेली. नुसती ओढली गेली नाही, तर दोन वर्षात ती फक्त बॉक्सिंग आणि बॉक्सिंगची झाली.
घरात वडिलांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. पण, दिशाला बॉक्सिंगचे वेड लागले होते. बॉक्सिंगचा क्लबही तिनेच शोधून काढला. थोडक्यात बॉक्सिंगचा श्रीगणेशा तिने तिचाच केला.
आसाम, गुवाहटी येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वामध्ये सुवर्ण यशानंतर तिच्याशी बोलताना तिचा हा सगळा प्रवास उलगडला. सुरवातीपासून निलेश बावीस्कर यांच्याकडे सराव करणा-या दिशाने दोन वर्षांत यंदाचे खेलो इंडियातील सुवर्णपदक पकडून एकूण आठ पदके मिळविली आहेत. यात चार सुवर्णपदकांचा समावेश आहे.
खेलो इंडियातील सुवर्णपदक माझ्यासाठी महत्त्वाचे असले, तरी पहिल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक मोलाचे वाटते. प्रथमच राज्य अजिंक्यपद मिळविल्याने माझी सर्वांना ओळख झाली, त्यामुळे मला या पदकाचा आनंद आहे.
आता खेलो इंडियाने राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदकामुळे माझा आनंद द्विगुणित झाला असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मला देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे, असे तिने सांगितले.