आयपीएल २०२१ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. तत्पूर्वी, प्ले ऑफसाठीची चुरस चांगलीच वाढलेली दिसून येतेय. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी प्ले ऑफमध्ये आपली जागा निश्चित केली असून, आणखी प्रत्येकी एक विजय मिळवला तरी, हे दोन्ही संघ पहिल्या दोन क्रमांकावर राहतील. त्यामुळे, खरी शर्यत हे तिसर्या आणि चौथ्या स्थानासाठी असेल. तिसऱ्या क्रमांकावरील आरसीबी संघ देखील प्ले ऑफमध्ये जाणारा तिसरा संघ बनण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे, अखेरच्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स संघ आपली सर्वशक्ती पणाला लावतील. सनरायझर्स हैदराबाद संघ यापूर्वीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आज आपण याच एका स्थानासाठी असलेल्या शर्यतीविषयी जाणून घेणार आहोत.
१) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)-
शुक्रवारी (१ ऑक्टोबर) पंजाबकडून पराभव पत्करावा लागला असला तरी, केकेआर अजूनही चौथ्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, प्ले ऑफमध्ये जाण्याची त्यांची शक्यता ६०% वरून ४०% पर्यंत कमी झालेली आहे. ते आता प्ले ऑफमध्ये पोहोचले तरी पहिल्या दोनमध्ये जाऊ शकणार नाहीत.
२) पंजाब किंग्स-
पंजाब किंग्सचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. कोलकात्याप्रमाणे त्याचे १० गुण आहेत. त्यांची अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आता ४० टक्के आहे. मात्र, ते देखील केकेआरप्रमाणे टॉप-२ पर्यंत पोहोचू शकत नाही.
३) मुंबई इंडियन्स-
मुंबई इंडियन्स संघ कोलकाता आणि पंजाबच्या खाली असला तरी त्याचे गुण समान आहेत आणि त्याचवेळी त्यांना अजून एक सामना खेळायचा आहे. याचा अर्थ असा की, त्यांची पहिल्या ४ मध्ये येण्याची शक्यता अजूनही ६६ टक्के आहे. ते अजूनही टॉप २ मध्ये स्थान मिळवू शकतात. मात्र, ही शक्यता एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
४) राजस्थान रॉयल्स-
आयपीएल उत्तरार्धात केवळ एक विजय मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफ्समध्ये जाण्याची शक्यता २५ टक्केच आहे. ते तिथपर्यंत पोहोचले तरी, पहिल्या दोन मध्ये त्यांना प्रवेश करता येणार नाही.