पुणे । पुण्याने आजपर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले आहेत. अशा खेळाडूंच्या जोरावरच खेळ मोठा होत असतो. त्यामुळे खेळ आणि खेळाडू ही दोन्ही चाके समान राहिली तरच दोन्ही गोष्टींचा विकास झपाट्याने होतो.
यासाठी प्रतिभावान खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या खेळाच्या जोरावर आपले नाव जगभरात निश्चित पोहचवतील, असे प्रतिपादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले.
संग्राम प्रतिष्ठान पुणे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रेल्वे इन्स्टिटयूटच्या मैदानावरील बॅडमिंटन हॉल येथे शिवछत्रपती व जिजामाता राज्य पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूंच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ते बोलत होते. संग्राम प्रतिष्ठान पुणे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शिवाजी बुचडे, सुवर्णयुग कब्बडी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ घोडके, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक गोविंद पवार, आंतरराष्ट्रीय अथलेटीक्स पंच सुनील शिवले, जगन्नाथ लाकडे, हर्षल निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक भास्कर भोसले, आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक गुरुबन्स कौर यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन खेळाडू तेजश्री नाईक हिचा सन्मान तेजश्रीची आई भाग्यश्री नाईक यांनी स्वीकारला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव साठे, शक्तीकुमार सावंत, सचिव बापूराव जाधव, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी विशेष मेहनत घेतली.