टी20 विश्वचषक 2024 अनेक कारणांसाठी खास होता. आयसीसीच्या या स्पर्धेत प्रथमच 20 संघ सहभागी झाले होते. अमेरिकेनं प्रथमच आयसीसी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तसेच सामने ड्रॉप-इन खेळपट्ट्यांवर खेळले जात होते. तसं पाहिलं तर, टी20 फॉरमॅटमध्ये फलंदाजांचं वर्चस्व असतं, परंतु ही स्पर्धा गोलंदाजांनी गाजवली.
या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त टी20 विश्वचषक 2024 नंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला अलविदा केला. यामध्ये भारताच्या 3 दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगत आहोत, ज्यांनी या स्पर्धेनंतर निवृत्ती घेतली.
विराट कोहली
विराट कोहलीनं अंतिम सामन्यात 59 चेंडूत 76 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताब मिळाला. या संस्मरणीय खेळीनंतर त्यानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहलीनं 125 टी20 सामने खेळले आणि 4188 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा
भारतानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचं विजेतेपदाचं दीर्घकाळचं स्वप्न पूर्ण झालं. या विजयानंतर पत्रकार परिषदेत रोहितनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं 159 टी20 सामने खेळले आणि 4231 धावा केल्या. तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
रवींद्र जडेजा
भारताच्या विजयाच्या एका दिवसानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. जडेजानं 74 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 515 धावा केल्या असून 54 विकेट घेतल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर
या ऑस्ट्रेलियन सलामीवीरानं टी20 विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याच्या कारकिर्दीचा शेवट चांगला झाला नाही, कारण ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. वॉर्नरनं कांगारुंसाठी 110 टी20 सामन्यांमध्ये 3277 धावा केल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं टी20 विश्वचषक 2024 च्या साखळी फेरीत पापुआ न्यू गिनी विरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला. बोल्टनं 61 सामन्यांत 83 विकेट्स घेऊन आपल्या टी-20 कारकिर्दीचा शेवट केला. 2024 च्या टी20 विश्वचषकात त्यानं चार सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या.
महमुदुल्लाह
बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू महमुदुल्लाहनं टी20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या 38 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं विश्वचषकात बांगलादेशकडून सात सामन्यांत 95 धावा केल्या. त्यानं एकूण 138 टी20 सामन्यांमध्ये 2394 धावा केल्या असून, ऑफ-स्पिन गोलंदाजीत 40 विकेट्सही घेतल्या आहेत.
डेव्हिड वीज
नामिबियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वीज यानं इंग्लंडविरुद्ध साखळी फेरीतल्या शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वीजनं 54 टी-20 सामन्यात 624 धावा केल्या असून 59 विकेट घेतल्या आहेत.
सायब्रँड एंजेलब्रेक्ट
नेदरलँड्सचा अनुभवी खेळाडू सायब्रँड अब्राहम एंजेलब्रेक्टनंही श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या 35 वर्षीय क्रिकेटपटूनं 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं 31.11 ची सरासरी आणि 132.7 च्या स्ट्राईक रेटनं 280 धावा केल्या आहेत.
ब्रायन मसाबा
युगांडाच्या ब्रायन मसाबानं 2024 च्या टी20 विश्वचषकातील संघाच्या मोहिमेनंतर टी20 क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. 32 वर्षीय ब्रायननं 61 टी20 सामन्यात 437 धावा केल्या असून 23 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील आयसीसी स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट
“नेपाळचा संघही त्याला आपल्या टीममध्ये स्थान देणार नाही”, शोएब मलिकनं केला बाबर आझमचा अपमान
या आयपीएल खेळाडूंची लागली लाॅटरी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश