येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. गेल्या काही सामन्यात भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर न्यूझीलंड संघही चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे क्रिकटप्रेमींना चुरशीची लढत पाहायला मिळेल यात काही शंका नाही.
तत्पुर्वी मंगळवारी (१५ जून) दोन्ही संघांनी आपल्या १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. मात्र अद्याप प्लेइंग इलेव्हनवरुन पडदा उटायचा बाकी आहे. अशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर भारताविरुद्धचा ऐतिहासिक सामनाही जिंकत न्यूझीलंड त्यांची विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. अशात चला तर पाहूया, कशी असू शकते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन? (Playing 11 of new zealand team for wtc Final)
टॉम लेथम : टॉम लेथम गेल्या काही वर्षांपासून न्यूझीलंड संघासाठी सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील तो सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडणार आहे. त्याने आतापर्यंत एकूण ५८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४१.८ च्या सरासरीने ४०१७ धावा केल्या आहेत.
डेवोन कॉनवे : डेवोन कॉनवेने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी द्विशतक झळकावले होते. अवघे २ कसोटी सामने खेळलेल्या डेवोन कॉनवेने ७६.५ च्या सरासरीने ३०६ धावा केल्या आहेत. तो कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात संघाला भक्कम सुरुवात करुन देऊ शकतो.
केन विलियमसन : न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन याच्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. यासह तो तिसऱ्या क्रमांकावर देखील संघासाठी मोलाची भूमिका पार पाडू शकतो. केन विलियमसनने आतापर्यंत एकूण ८४ कसोटी सामन्यात ५४.३१ च्या सरसरीने ७१२९ धावा केल्या आहेत.
रॉस टेलर : रॉस टेलर हा न्यूझीलंड संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. या मोठ्या सामन्यात त्याची भूमिका देखील महत्वाची असणार आहे. तो विलियमसननंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरु शकतो. रॉस टेलरने आतापर्यंत एकूण १०७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४५.२८ च्या सरसरीने ७५०७ धावा करण्यात यश आले आहे.
हेनरी निकोलस : हेनरी निकोलसने गेल्या २ वर्षात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याच्यावर न्यूझीलंड संघाच्या मध्यक्रमाची जबाबदारी असणार आहे. हेनरी निकोलसने आतापर्यंत एकूण ३९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४३.४ च्या सरासरीने २२५७ धावा केल्या आहेत.
बीजे वॅटलिंग: न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग हा नेहमीच आपल्या यष्टीरक्षणामुळे चर्चेत असतो. यासोबतच तो संघासाठी फलंदाजीमध्येही मोलाचे योगदान देऊ शकतो. हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे तो आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेल. त्याने आतापर्यंत एकूण ७४ सामने खेळले आहेत. यात त्याला ३९८९ धावा करण्यात यश आले आहे.
कॉलीन डी ग्रँडहोम : इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. अशा परिस्थितीत कॉलीन डी ग्रँडहोम न्युझीलंड संघासाठी मोलाची भुमिका बजावू शकतो. तसेच ७ व्या क्रमांकावर येऊन तो फलंदाजीही करू शकतो. त्याने आतापर्यंत एकूण २५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ११९४ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ४७ गडी देखील बाद केले आहेत.
काइल जेमिसन : न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसन याने गेल्या काही सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांना अडकवून ठेवले होते. त्याने आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २३५ धावा करण्यात यश आले आहे. तर त्याने ३९ गडी देखील बाद केले आहेत.
टीम साउथी : न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउथी हा या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. टीम साउथीला इंग्लंडमध्ये स्विंग मिळू शकतो. ज्यामुळे तो भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकण्यात तो यशस्वी ठरेल. त्याने आतापर्यंत एकूण ७८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ३०९ गडी बाद करण्यात यश आले आहे.
निल वैगनर : निल आपल्या शॉर्टपिच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या गोलंदाजीने स्टीव्ह स्मिथसारख्या फलंदाजालाही अडचणीत टाकले आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत एकूण ५३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २२६ गडी बाद करण्यात यश आले आहे.
ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंड संघाला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर यामध्ये ट्रेंट बोल्टची भूमिका महत्वाची असणार आहे. इंग्लंडच्या वातावरणात ट्रेंट बोल्ट भल्याभल्या फलंदाजांना माघारी धाडू शकतो. त्याने आतापर्यंत एकूण ७२ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २८७ गडी बाद करण्यात यश आले आहेत.
न्यूझीलंडची संभावित प्लेइंग इलेव्हन- टॉम लेथम, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेनरी निकोलस, बीजे वॅटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जेमिसन, टीम साउथी, निल वैगनर, ट्रेंट बोल्ट
महत्त्वाच्या बातम्या-
‘इंग्लंडविरुद्धचा विजय भारतापुढे बिनकामी,’ न्यूझीलंडच्या अव्वल गोलंदाजाची कबुली
भारतीय संघाची चिंता मिटली! ‘या’ कामगिरीत कोहली आहे विलियम्सनपेक्षा सरस
शाहिद आफ्रिदीने निवडली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, केवळ एका भारतीय खेळाडूला दिले स्थान