जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर कठीण 444 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 164 धावा केल्या आहेत. उर्वरित 280 धावा बनवण्यासाठी भारतीय संघ व चाहत्यांची सर्वात मोठी आशा विराट कोहली असेल. असे असतानाच विराटने या सामन्याच्या आधी दिलेल्या मुलाखतीतील काही भाग आयसीसीने नुकताच प्रदर्शित केला आहे.
विराटने दिलेल्या या मुलाखतीतील काही अंश यापूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांची स्तुती केली होती. या नव्या भागामध्ये विराट आपल्या प्रेरणा व देशाभिमानाविषयी बोलताना दिसतोय. विराट म्हणाला,
“मी भारतीय संघासाठी खेळतो, हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. तो एक मोठा अभिमान घेऊन मी मैदानात उतरत असतो. ज्यावेळी संघ जिंकतो आणि माझे त्यात योगदान असते त्यावेळी माझा आनंद द्विगुणीत होतो. संघ जिंकतो यातूनच आम्ही प्रयत्न घेत राहतो.”
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे 2008 पासून प्रतिनिधित्व करतोय. तेव्हापासून तो आतापर्यंत जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 467 धावा केल्यानंतर भारतीय संघ 296 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करत आपली आघाडी वाढवली. विजयासाठी 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाच्या खेळानंतर भारताने 3 बाद 164 धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज असेल.
(Playing For India Is My Biggest Motivation Virat Kohli In ICC Interview)
महत्वाच्या बातम्या –
कसोटीत पाचव्या दिवसाचा बॉस आहे कोहली! ‘ही’ आकडेवारी उंचावतेय चाहत्यांच्या अपेक्षा
सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम