पुणे: येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीची धडाकेबाज फलंदाज स्म्रिती मानधना हिने पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली. महाराष्ट्रातील सांगली या गावातून आलेल्या या युवा क्रिकेटपटूने विश्वचषकात आपल्या धडाकेबाज खेळीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. या पत्रकार परिषदेत तिने आपल्या विश्वचषकातील प्रवासावर प्रकाश टाकला.
” विश्वचषकाचा प्रवास खूपच अविस्मरणीय आहे. जेव्हा मला दुखापत झाली होती तेव्हा मला वाटले ही नव्हते की मला विश्वचषकाच्या संघात जागा मिळेल. पण देवाच्या कृपेने मी विश्वचषकाच्या आधी तंदुरुस्त झाले आणि मी पहिल्या दोन्ही सामन्यात चांगला खेळ करू शकले. त्यानंतर माझ्याकडून चांगली कामगिरी झाली नाही पण तरी आमचा संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला. आम्ही जरी या वेळी अंतिम सामना जिंकलो नसलो तरी पुढच्या वेळी आम्ही नक्कीच विश्वचषक जिंकू.”
विश्वचषकानंतर आयुष्यात किती बदल झाला असे विचारले असता स्मृती म्हणाली, ” आयुष्य खूप बदल झाला आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की आम्हाला हे दिवस पहिला मिळतील. विश्वचषकानंतर आम्ही जेव्हा भारतात आलो तेव्हा विमानतळावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. सगळीकडे फक्त चाहतेच दिसत होते. सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. सांगलीतही आता मला घरबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. चाहते आता माझ्या गाडीला ही ओळखायला लागले आहेत. अस होईल हे मला कधीच वाटले नव्हते. एका विश्वचषकाने आमच्या सर्वांचे आयुष्य खूप बदलूनटाकलं आहे. ”
विश्वचषकात काय अडचणी आल्या असे विचारले असता ती म्हणाली, ” जेव्हा आम्ही विश्वचषक खेळण्यासाठी गेलो तेव्हा आम्ही असा विचार करत होतो की आम्ही जर उपांत्य फेरीत जरी पोहचलो तरी खूप आहे. आमचा संघ एवढा पण अनुभवी नव्हता. पण आम्ही ३ वर्ष एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला. वैयक्तिक बोलायचं झाल तर मी विश्वचषकाच्या संघात असणार का नाही यावर ही प्रश्न चिन्ह होते. दुखापती नंतर माझ फक्त एकच ध्येय होते विश्वचषक खेळण्याचं.”
“त्यानंतर मी जेव्हा विश्वचषकाचा पहिला सामना खेळले तेव्हा माझ्यावर खूप दबाव होता. पहिल्या सामन्यात मला असे वाटत होते की मला फलंदाजी करताच येत नाही पण त्यानंतर बाकी संघ सहकार्याने मला खूप मदत केली आणि खूप प्रेरित केले. प्रत्येक सामन्यात एक वेगळा सामनावीर होता आणि हेच दाखवून देते की भारतीय संघाने एवढी चांगली कामगिरी केली ते संघाच्या एकत्रित प्रयत्नामुळे. विश्वचषकामध्ये दोन सामने हरल्यानंतर न्यूझीलँड विरुद्ध जिंकल्यामुळे आमचं मनोधर्य खूप उंचावले.”