संयुक्त अरब अमिराती येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (१० नोव्हेंबर) पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. २०१९ वनडे विश्वचषकातील अंतिम सामना खेळणारे इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ या सामन्यात आमने-सामने असतील. हा सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा इंग्लंडचा मानस असेल. तर, न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरी खेळण्याचा प्रयत्न करेल. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर गाठली उपांत्य फेरी
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडने पहिल्या सामन्यापासून विरोधी संघांवर वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडीज, बांगलादेश, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या संघांना त्यांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेने त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत केले होते. फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडसाठी चिंतेची बाब म्हणजे नियमित सलामीवीर जेसन रॉय दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
न्यूझीलंडची सांघिक कामगिरी
पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने भारत, स्कॉटलंड, नामिबिया व अफगाणिस्तानला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी व ऍडम मिल्ने या वेगवान गोलंदाजांना मिचेल सॅंटनर व ईश सोढी यांनी सुयोग्य साथ दिली आहे. कर्णधार केन विलियम्सन, अनुभवी मार्टिन गप्टिल यांच्यासह डेरिल मिचेल व डेवॉन कॉनवेयांनी उपयुक्त खेळ्या करत संघाच्या विजयात योगदान दिले.
उपांत्य सामन्यासाठी दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन-
इंग्लंड-
जोस बटलर, डेव्हिड मलान, सॅम बिलींग्स, ओएन मॉर्गन (कर्णधार), लियाम लिव्हींगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद व मार्क वूड.
न्यूझीलंड-
डेरिल मिचेल, मार्टिन गप्टिल, केन विलियम्सन (कर्णधार), डेवॉन कॉनवे, जिमी निशाम, मिचेल सॅंटनर, ग्लेन फिलीप्स, टिम साउदी, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट व ऍडम मिल्ने.