पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी वनडे मालिका अचानक स्थगित झाली होती. न्यूझीलंड संघाने सूरक्षेच्या कारणाने दौरा मागे घेत असल्याचे सांगितले होते. या पाठोपाठ इंग्लंड क्रिकेट संघानेही पाकिस्तान दौरा रद्द केला. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. कारण ते स्वतः पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. आता ऑस्ट्रेलियाने देखील पाकिस्तान दौरा करण्याबाबत साशंक असल्याचे सांगितले आहे. यातच इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -२० विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे खेळण्याचा सल्ला दिला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाने दौरा रद्द केल्यामुळे इम्रान खान यांनी स्वत: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना फोन करून सुरक्षेचे आश्वासन दिले होते. पण, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी इम्रान खान यांना प्रतिसाद दिला नाही. यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाची भेट घेत अपमानाचा बदला घ्या, असे आवाहन केले आहे.
इम्रान खान यांनी पाकिस्तानी खेळाडूंना टी -२० विश्वचषकात चांगले खेळून न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द केल्याचा बदला घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरे रद्द केल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी संघाला भेटून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपने घबराना नहीं’ असे म्हणत त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे.
भारतावर लावलेले आरोप
यापुर्वी पाकिस्तानचे सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या सर्व घटनेमागे भारताचा हात आहे असे म्हटले होते. फवाद चौधरी म्हणाले होते, “न्यूझीलंड क्रिकेट संघाला पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा धमकीचा ई मेल भारतातून आला होता.” असाही दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे, संघ मायदेशी परतल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने धमकीची माहिती मिळाली, पण त्याचा सविस्तर तपशील मिळालेला नसल्याचं सांगितलं आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
श्रीलंका संघावर झालेला दहशतवादी हल्ला
याआधी मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. ज्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते. श्रीलंका संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला होता.