भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरपर्यंत हा सामना पाहत, भारताच्या विजयानंतर ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन करताना म्हटले,
“भारतीय संघाने आशिया चषकातील आजच्या सामन्यात शानदार अष्टपैलू खेळ दाखवला. भारताने दाखवलेल्या या कौशल्य दाखवले. भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन.”
#TeamIndia put up a spectacular all-round performance in today’s #AsiaCup2022 match. The team has displayed superb skill and grit. Congratulations to them on the victory.
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2022
या सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास, दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार तर हार्दिक पंड्याने तीन बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. गोलंदाजांच्या या उत्कृष्ट कामगिरीमूळे पाकिस्तानचा डाव 147 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात ही खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला. तर, जम बसल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव माघारी परतले. मात्र, अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी फलंदाजी आपले मोलाचे योगदान देत भारताचा विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.