30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे केवळ 2 महिने कालावधी उरलेल्या या विश्वचषकासाठी सर्व संघाची तयारी सुरु आहे. भारतीय संघही त्यादृष्टीने तयारी करत आहे. पण मागील अनेक दिवसांपासून भारतीय संघव्यवस्थापनासमोर चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला खेळवायचे हा प्रश्न उभा आहे.
अनेक दिवसांपासून यावर चर्चा होत आहेत. त्यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर खेळवावे असे म्हटले आहे. तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पंतला भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
याबद्दल पॉटिंग म्हणाला, ‘मी त्याची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करेल,ही पहिली गोष्ट मी करेल. मी त्याला फलंदाज म्हणून खेळवेल आणि चौथ्या क्रमांकावर खेळवेल. तो अशा प्रकारचा प्रतिभावान खेळाडू आहे, तो तूम्हाला विश्वचषक जिंकून देऊ शकतो. त्याला तो एक्स-फॅक्टर मिळाला आहे.’
पुढे गांगुली म्हणाला, ‘कोणालाही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर तूम्हाला वर जावे लागेल आणि आपण जगात असे सर्वोत्तम खेळाडू पाहिले आहेत. जर तूम्ही रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवले तर तो तूमच्यासाठी धावा करेल कारण त्याच्यात खूप प्रतिभा आहे. त्याला खेळण्यासाठी वेळ मिळेल.’
‘इतक्या कमी वेळात त्याने भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ज्यावेळी त्याला सातत्याने संधी मिळेल, तो अव्वल दर्जाचा खेळाडू बनेल.’
पंतने भारताकडून मागील वर्षी जूनमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, या पदार्पणानंतर पंतची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळताना शतके केली आणि तो या दोन देशात शतके करणारा भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला. मात्र असे यश त्याला मर्यादीत षटकांमध्ये मिळालेले नाही.
याविषयी दिल्ली कॅपिटल्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गांगुली म्हणाला, ‘तो(पंत) ज्याप्रकारे मागील आयपीएल मोसम खेळला ते पहा. तो संपूर्ण स्पर्धा खेळला. 14 सामन्यात खेळताना तो मागीलवर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता.’
‘मर्यादीत षटाकांच्या बाबतीत त्याची समस्या अशी आहे की त्याला तसे क्रिकेट नियमितपणे खेळायला मिळत नाही. कारण तूमच्याकडे धोनीसारखा चॅम्पियन खेळाडू आहे. तो मर्यादीत षटकातील जवळजवळ सर्व सामने खेळतो. त्यामुळे रिषभ पंत प्रत्येक वेळी आत-बाहेर करत असतो आणि तूम्ही कितीही कौशल्यपूर्ण खेळाडू असला तरी ती तूमच्यासाठी चांगली गोष्ट नाही.’
गांगुली पुढे म्हणाला, ‘तो कसोटीमध्ये यशस्वी झाला कारण तो सातत्याने खेळत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये किती भारतीय यष्टीरक्षकांनी कसोटी शतके केली आहेत, आणि त्याने ते सहज केले.’
‘माझ्यासाठी तो तूमचे भविष्य आहे. पुढील 10 वर्षात तो तूम्हाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खूप खेळताना दिसेल. कारण तो दिल्लीसाठी खेळतो म्हणून नाही तर तो त्याला पाहिजे तिथे खेळू शकतो.’
त्याचबरोबर गांगुली म्हणाला, ‘तो खरचं प्रतिभावान खेळाडू आहे. तो मेहनती आहे. मी त्याला गेले चार वर्षे नेटमध्ये पाहत आहे. तो नेहमी पहिला येतो आणि बराच काळ फलंदाजी करतो. तो येणाऱ्या वर्षांत भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेमतेम ३ दिवस राहिलेल्या आयपीएलमधील संघांचे असे आहेत खेळाडू
–मोठी बातमी- आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, असे आहेत मुंबईतील सामने
–काय सांगता! सुरेश रैनानेही मारले दणदणीत ६ षटकार