यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघ आपापल्या तयारीला लागला आहे. दरम्यान, या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपली प्रतिक्रिया देताना सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाची कमजोरी काय आहे, याबद्दलही भाष्य केले आहे. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचेही उदाहरण दिले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी फिनिशरची भूमिका चिंतेची बाब – पाँटिंग
पाँटिंगने म्हटले आहे की टी२० विश्वचषकाचा विचार करता ऑस्ट्रेलियाकडे धोनी किंवा हार्दिक पंड्यासारखा एखादा फिनिशर नाही. तो क्रिकेट.कॉम.एयूशी बोलताना म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियासाठी फिनिशरची भूमिका नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. त्यासाठी एक विशेष खेळाडू हवा, जो तीन-चार षटके खेळून ५० धावाही जमवू शकतो.’
तो पुढे म्हणाला, ‘धोनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अशाच क्रमांकांवर खेळला आहे आणि तो यात माहिर आहे. हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड देखील याच स्थानांवर खेळतात. ते देखील देशाच्या आणि आयपीएल संघासाठी सामना जिंकवून देतात. त्यांना त्या स्थानांवर खेळण्याची सवय आहे.’
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणारा पाँटिंग पुढे म्हणाला, ‘ग्लेन मॅक्सवेल किंवा मिशेल मार्श हे काम करु शकतात का, किंवा मग मार्कस स्टॉयनिस. मला वाटते ऑस्ट्रेलियासाठी सर्वात दास्त चिंतेचा विषय हाच आहे.’
पाँटिंग म्हणाला, ‘मी मागीलवर्षी स्टॉयनिसला दिल्लीकडून फलंदाजी करताना पाहिले आहे. त्याने बिगबॅश लीगमधील काही सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्ससाठी चांगली कामगिरी केली होती. पण मला असा फलंदाज पाहिजे जे फिनिशरची भूमिका निभावू शकेल. त्याने दिल्लीला २-३ सामने आपल्या फलंदाजीच्या बळावर जिंकून दिले होते.’
यष्टीरक्षक ही देखील एक समस्या
पाँटिंगने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियासाठी यष्टीरक्षक ही देखील एक समस्या आहे. तो म्हणाला, ‘यष्टीरक्षक फलंदाज ही अशी जागा आहे, ज्यामुळे सध्या सर्वांची झोप उडाली आहे. ऑस्ट्रेलियन संघासमोर अजूनही काही प्रश्न आहेत, त्यांचा संघ कसा दिसतो आणि मला वाटते सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यष्टीमागे कोण उभे राहाणार?’
पाँटिंग पुढे म्हणाला, ‘ही जागा भरण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. मॅथ्यू वेड संघाचा भाग आहे, जोश फिलिप केवळ एक फलंदाज म्हणून खेळला आहे. ऍलेक्स कॅरी आत-बाहेर होत आहे. तसेच त्याला वेगवेगळ्या फलंदाजी क्रमांकावर खेळवण्याचा प्रयत्न झाला आहे.’
त्याचबरोबर पाँटिंगने यष्टीरक्षक जोश इंग्लिसवरही विश्वास दाखवला आहे. पाँटिंग म्हणाला, ‘तो फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो आणि जर विश्वचषक भारतात किंवा युएईमध्ये होणार असेल तर त्याचे नाव पुढे येऊ शकते.’
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी आयसीसीची कठोर नियमावली, बायो बबलसह भारताला ‘हे’ नियम लागू
शुबमन गिलने ‘रिलेशनशीप स्टेटस’बद्दल केला खुलासा; सारा तेंडुलकरबरोबर जोडले जात होते नाव
‘त्यावेळी’ धोनीने केली होती पीटरसनची बोलती बंद, उथप्पाने उलगडला किस्सा