भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी (२९ मे) झालेल्या बैठकीत आयपीएलचे उर्वरित सामने आणि टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले. यात मध्यातच स्थगित झालेल्या २०२१च्या आयपीएल हंगामाचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हे सामने खेळवले जातील.
मात्र त्याचवेळी भारतात होणार्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीकडे एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. भारतातील कोरोना महामारीच्या परिस्थितीवर हा निर्णय अवलंबून आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने ठोस निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवून देण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. आता या मागणीमागील नेमके कारण समोर आले आहे.
दोन कारणे आली समोर
बीसीसीआयच्या शनिवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत सगळया सदस्यांनी दोन प्रस्तावांना बहुमताने मंजुरी दिली. यातील एक निर्णय आयपीएल बाबत घेण्यात आला. तर दुसरा निर्णय टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून मागण्याचा झाला. यातील मुदत का वाढवून घेण्यात आली, याबाबत बैठकीला उपस्थित असलेल्या एका राज्य संघटनेच्या सदस्याने माहिती दिली. या माहितीनुसार टी२० विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात करण्यात येणार आहे. मात्र आत्ताच ऑक्टोबर महिन्यात भारतात कोरोनाची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज बांधणे कठीण असेल. त्यामुळेच परिस्थितीचा शक्य तेवढा अचूक अंदाज लावण्यासाठी मुदत वाढवून मागावी, असा प्रस्ताव बीसीसीआयच्या बैठकीत संमत करण्यात आला.
मात्र या व्यतिरिक्त अजून एक कारण देखील या निर्णयामागे असल्याचे समोर आले आहे. करामध्ये सूट मिळण्याबाबतचा हा मुद्दा असल्याचे या राज्य संघटनेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आयसीसीला भारताकडून टी२० विश्वचषकावेळी करातून सूट मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र बीसीसीआय ही अट मान्य करु शकणार नसल्याचे चित्र आहे. कारण भारत सरकारच्या नियमांचे पालन करणे, बीसीसीआयला बंधनकारक आहे. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी देखील बीसीसीआय मुदत वाढवून घेत असल्याचे कळते. आता आयसीसी बीसीसीआयला ही परवानगी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी आयसीसीची कठोर नियमावली, बायो बबलसह भारताला हे नियम लागू
‘त्यावेळी’ धोनीने केली होती पीटरसनची बोलती बंद, उथप्पाने उलगडला किस्सा
सुशीलआधी ‘या’ सहा ऑलिंपियनने भोगलाय तुरुंगवास; सुवर्णपदक विजेत्यांचाही समावेश