आयपीएलमध्ये बुधवारी (२१ एप्रिल) दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गुणतालिकेत तळाशी असलेल्या पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून हैदराबादने हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. मात्र, हा सामना पंजाबचा फलंदाज निकोलस पूरन याच्यासाठी विसरण्यासारखा राहिला. या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर पूरनने १३ वर्षांपूर्वीच्या एका नकोशा विक्रमाची बरोबरी केली.
पूरनचे तीन डक
पंजाब किंग्सचा मधल्या फळीतील फलंदाज निकोलस पूरन याच्यासाठी हा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिला आहे. पूरनने या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत चार सामने खेळताना ११ चेंडूंचा सामना करत ९ धावा बनविल्या आहेत. यामध्ये तो ३ वेळा खातेदेखील खोलू शकला नाही.
राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या पहिल्या सामन्यात तो एक चेंडू खेळून बाद झाला होता. तर, चेन्नई विरुद्ध देखील तो दोन चेंडू खेळून खाते न खोलता तंबूत परतलेला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ९ धावा बनविल्या. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात तर, एकही चेंडू न खेळता धावबाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. अशाप्रकारे, एका आयपीएल हंगामात सिल्वर डक, गोल्डन डक व डायमंड डक अशाप्रकारे बाद होणारा पूरन केवळ दुसरा फलंदाज बनला.
आयपीएलच्या इतिहासात सर्वप्रथम एकाच हंगामात तीनप्रकारे (सिल्वर डक, गोल्डन डक व डायमंड डक) शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न होता. वॉर्न दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसऱ्या आयपीएल हंगामात दिल्ली डेरडेव्हिल्सविरुद्ध सिल्वर डक, डेक्कन चार्जर्सविरुद्ध गोल्डन डक व मुंबई इंडियन्सविरुद्ध डायमंड डकवर बाद झालेला.
तीन डकचा अर्थ
क्रिकेटमध्ये फलंदाज शून्यावर बाद झाल्यास डक संबोधले जाते. दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाल्यास सिल्वर डक, एक चेंडू खेळून शून्यावर बाद झाल्यावर गोल्डन डक आणि एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाल्यास डायमंड डक अशी संज्ञा वापरली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
फिंचला हटवून हा खेळाडू टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी, तर विराट ‘या’ क्रमांकावर
दिल्लीविरुद्ध पोलार्डने केले होते नेतृत्व, तरीही दंड मात्र रोहित शर्माला; कारण घ्या जाणून