पुणे। सचिन कापडेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मॅजेंटा संघाने ऑरेंज संघाला ८ गडी राखून पराभूत करत ‘द पूना प्रेस ओनर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पीपीओए प्रीमिअर लीग’ या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील मैदानावर झालेल्या अंतिम लढतीमध्ये अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना ऑरेंज संघाने निर्धारित ०७ षटकांत ३ बाद ५६ धावापर्यंत मजल मारली. यात रितेश परदेशी (१९), योगेश राजेंद्र (१६) मयूर चरतकर (९) यांनी आक्रमक फलंदाजी केली. मॅजेंटा संघाकडून तरक पारिकने २ गडी बाद केले. सचिन कापडेच्या दमदार ३४ धावांच्या जोरावर मॅजेंटा संघाने ५.५ षटकांत बिनबाद ५७ धावा करताना विजय साकारला. त्यांना नितीन गुणे (१९)ने सुरेख साथ दिली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू व अंतिम लढतीतील सामनावीर म्हणून मॅजेंटा संघाच्या सचिन कापडे यांना सन्मानित करण्यात आले. रेड संघाच्या अमेय जोशीला ‘सर्वोत्तम फलंदाज’ म्हणून, तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून व्हायोलेट संघाचे गिरीश राव यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी रणजी खेळाडू प्रसाद कानडे व `द पूना प्रेस ओनर्स असोसिएशन`चे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर, माजी अध्यक्ष सुरेंद्र सावळे, प्रकाश जोशी, प्रकाश घोडके, दीपक ढोलेपाटील, किशोर गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.