खेळाच्या सर्वात मोठ्या महाकुंभाचं आयोजन यंदा पॅरिसमध्ये होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात झाली. तर स्पर्धेचा समारोप 11 ऑगस्टला होणार आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकशी संबंधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांची समारोप समारंभासाठी ध्वजवाहक म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं (आयओए) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटलंय की, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी नेमबाज मनू भाकर आणि हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश यांना ध्वजवाहक घोषित करताना खूप आनंद होत आहे. आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या, श्रीजेश आमच्यासाठी एक भावनात्मक आणि लोकप्रिय पर्याय होता. त्या म्हणाल्या, श्रीजेशनं गेल्या दोन दशकात भारतीय हॉकी आणि एकूणच भारतीय खेळांमध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे.
विशेष म्हणजे पीटी उषा यांनी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राशीही संवाद साधला होता. नीरजनंही श्रीजेश याचंच नाव सुचवल्याचं त्या म्हणाल्या. पीटी उषा म्हणाल्या, “मी नीरज चोप्राशी बोलले. त्यानं खूप नम्रतेनं सांगितलं की, समारोप समारंभात श्रीजेश भारताचा ध्वजवाहक असावा. तो म्हणाला की, तुम्ही मला विचारलं नसतं, तरी मी श्रीजेशचंच नाव सुचवलं असतं”
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरनं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं होतं. तिनं 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं. यानंतर तिनं सरबज्योत सिंग सोबत मिश्र इव्हेंटमध्येही कांस्यपदक जिंकलं. अशाप्रकारे मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
दुसरीकडे, भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केली. टीम इंडियानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर कब्जा केला आहे. भारतीय संघानं कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा 2-1 असा पराभव केला.
हेही वाचा –
टोकियो ते पॅरिस… गोल्ड आणि सिल्वर! नीरज चोप्रा कसा बनला ऑलिम्पिकमधील भारताचा सर्वात मोठा ॲथलीट?
क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं, भालाफेकीत मोडला ऑलिम्पिक रेकॉर्ड! कोण आहे पाकिस्तानचा नवा सुपरस्टार अर्शद नदीम?
“तो पण माझ्या मुलासारखाचं… “, नीरजच्या आईने पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर केला प्रेमाचा वर्षाव