भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेशनं निवृत्ती घेतली. हे ऑलिम्पिक आपलं शेवटचं असेल असं त्यानं आधीच सांगितलं होतं. मात्र आता निवृत्तीनंतरही श्रीजेश भारतीय हॉकी संघाशी जोडलेला राहणार आहे. हॉकी इंडियानं त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
भारतीय संघाला श्रीजेश सारख्या कीपरची उणीव नक्कीच भासेल. तो अनेक वर्ष भारताची भिंत बनून राहिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्यानं अनेक उत्कृष्ट सेव्ह केले. कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनविरुद्धच्या विजयानंतर प्रत्येक भारतीय खेळाडूनं हा विजय पीआर श्रीजेशला समर्पित असल्याचं सांगितलं होतं.
श्रीजेशचं हे योगदान लक्षात घेऊन हॉकी इंडियानं त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी सांगितलं की, श्रीजेशला भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचं प्रशिक्षक बनवलं जाईल. म्हणजेच, निवृत्तीनंतरही श्रीजेश भारतीय हॉकी संघाशी जोडलेला राहणार आहे. आता तो ज्युनियर खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसेल.
जर आपण पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं आपल्या 18 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण 335 सामने खेळले. या काळात त्यानं भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदकं जिंकली. या दोन्ही ऑलिम्पिक पदकात श्रीजेशचं योगदान सर्वात मोठं होतं. प्रत्येक सामन्यात त्यानं ज्या प्रकारचे सेव्ह केले, त्यामुळे टीम इंडिया अनेकदा कठीण परिस्थितीतून बाहेर पडली.
पीआर श्रीजेशनं 2006 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं एकदाही मागे वळून पाहिलं नाही. 2008 च्या ज्युनियर आशिया चषकात त्याला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार मिळाला होता. तर 2016 मध्ये तो भारतीय हॉकी संघाचा कर्णधारही बनला होता.
हेही वाचा –
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू
‘ट्रान्सजेंडर’ इमान खलीफनं जिंकलं सुवर्णपदक; महिला असण्याबद्दल झाले होते प्रश्न उपस्थित
भारताला सहावे पदक मिळवून देणाऱ्या अमन सेहरावतवर प्रेमाचा वर्षाव, पाहा कोण काय म्हणाले