मध्य रेल्वे विरुद्ध देना बँक यांच्यातील लढतीने प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेला आज दि. २६एप्रिल२०१८ रोजी प्रारंभ होईल.
महाराष्ट्र राज्य व मुं. शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने प्रभादेवी येथील मुरारी घाग मार्गाजवळील क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेत १२ निवडक व्यावसायिक पुरुष संघांना प्रवेश देण्यात आला आहे.
दि.२६ते३०एप्रिल या कालावधीत मॅटच्या एका क्रीडांगणावर सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात हे सामने खेळविण्यात येतील. कबड्डीप्रेमींना या प्रो- कबड्डी स्टार खेळाडूंच्या खेळाचा आनंद मनमुराद लुटता यावा म्हणून प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे.
सामना कशा पद्धतीने खेळला जात आहे याची उत्कंठा वाढविण्याकरिता धावत्या विद्युत गुणफलकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला ” आमदार चषक” व रोख रु. एक लाख एकावन्न हजार पारितोषिक म्हणून बहाल केले जातील. उपविजेत्या संघास चषक व रोख रु.एक लाख प्रदान केले जातील.
उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु. एकावन्न हजार व चषक देण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस आकर्षक भेटवस्तू किंवा ” मोटर बाईक ” बक्षिसादाखल देण्यात येईल.
शिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा व पकडीचा खेळाडू, दिवसाचा मानकरी, प्रत्येक सामन्यातील उत्तम खेळ करणारा खेळाडू यांना देखील आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेला विभागीय आमदार सदा सरवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक समाधान सरवणकर या स्पर्धेवर जातीने लक्ष ठेऊन आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन गुरू. दि.२६एप्रिल रोजी सायंकाळी ५-००वा. होणार आहे. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेत सहभागी १२संघाची ४गटात विभागणी करण्यात आली आहे. ही गटवारी खालील प्रमाणे.
स्पर्धेत सहभागी संघाची गटवारी :-
अ गट :- १)महिंद्रा, २)देना बँक, ३) मध्य रेल्वे.
ब गट :- १) नाशिक आर्मी, २) एअर इंडिया, ३) मुंबई बंदर.
क गट :- १)बी ई जी पुणे, २)महाराष्ट्र पोलीस, ३)बँक ऑफ इंडिया.
ड गट :- १)आयकर पुणे, २)भारत पेट्रोलियम, ३)युनियन बँक.