सध्या प्रो-कबड्डीचा मुक्काम रांचीमध्ये आहे. रांची पटणा पायरेट्स संघाचे घरचे मैदान आहे. पटणा पायरेट्स संघाच्या पाठीराख्यांसाठी घरच्या मैदानावरील सामने खूप अविस्मरणीय होत आहेत. डुबकी किंग प्रदीप नरवाल आणि विक्रम हे नवीन समीकरण प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात आपणास पाहायला मिळत आहे. प्रदीपने सलग तीन दिवस अनुप कुमारचे प्रो-कबड्डीमधील पहिल्या मोसमातील मोठे विक्रम मोडले आहेत. जे विक्रम मागील चारही मोसमात अबाधित होते ते विक्रम घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर प्रदीपने मोडले आहेत.
# रांचीतील पहिला सामना १५ सप्टेंबर, अनुप कुमारचा सर्वाधिक “रेडींग गुणांचा” विक्रम प्रदीप नरवालने मोडला.
रांची लेगमधील पहिल्या सामन्यात प्रदीपने अनुप कुमारचा एका मोसमात सर्वाधीक १५५ रेडींग गुण मिळवण्याचा विक्रम प्रदीपने मोडला. या सामन्याअगोदर प्रदीपने ११ सामन्यात रेडींगमध्ये १४९ गुण मिळवले होते. या सामन्यात तेलुगू टायटन्स विरुद्ध खेळताना त्याने १४ गुण मिळवत अनुपचा हा विक्रम मोडला. अनुपने हा विक्रम १६ सामने खेळताना केला होता.
# रांचीतील दुसरा सामना १६ सप्टेंबर, अनुप कुमारचा एका मोसमात “सर्वाधीक गुण” मिळवण्याचा विक्रम प्रदीपने मोडला.
रांची लेगच्या दुसऱ्या सामन्यात पटणाचा सामना युपी योद्धा संघा विरुद्ध होता. या सामन्या अगोदर प्रदीपच्या नावावर १२ सामन्यात १६३ गुण होते. त्याला अनुपचा सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडण्यासाठी ७ गुणांची गरज होती. या सामन्यात त्याने रेडींगमध्ये १५ गुण मिळवत एका मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडला. या सामन्यानंतर त्यांच्या नावावर १३ सामन्यात १७८ गुण झाले.
# रांचीतील तिसरा सामना १७ सप्टेंबर, अनुपचा एका मोसमात सर्वाधीक “सुपर टेन” मिळवण्याचा विक्रम प्रदीपने मोडला.
रांचीलेग मधील तिसऱ्या सामन्यात पटणा पायरेट्सचा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध होता. हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात प्रदीपला एका मोसमात सर्वाधीक सुपर टेन मिळवण्याचा विक्रम करण्याची संधी होती. या सामन्याअगोदर अनुप कुमार आणि प्रदीप नरवाल हे एका मोसमात सर्वाधिक १० सुपर टेन करत या विक्रमात संयुक्तरित्या अव्वल स्थानी होते. अनुपने हा विक्रम पहिल्या मोसमात केला होता तर प्रदीपपणे या मोसमात या विक्रमला गवसणी घातली होती. या सामन्यात प्रदीपने रेडींगमध्ये १३ गुण मिळवले. १० रेडींग गुण मिळवताच त्याचे सुपर टेन पूर्ण झाले होते. त्यामुळे त्याने एका मोसमात सर्वाधीक सुपर टेन मिळवण्याचा अनुपचा विक्रम मोडला.
विशेष बाब म्हणजे त्याने हे सारे विक्रम सलग दिवसात मोडले आहेत.