काल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात पटना पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजायन्टला धूळ चारत सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचया चषकावर आपले नाव कोरले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे पटनाचा कर्णधार प्रदीप नरवाल. या संपूर्ण मोसमात जी एक गोष्ट सातत्याने दिसून आली ती म्हणजे प्रत्येक सामन्यात प्रदीप नरवालने केलेली अप्रतिम कामगिरी.
कालचा सामना हा या मोसमातील सर्वोत्कृष्ट सामना होणार असे सर्व कबड्डी प्रेमींना अपेक्षित होते. हा सामना होता गुजरात फॉर्च्युनजायन्टसचा डिफेन्स विरुद्ध डुबकी किंग प्रदीप नरवाल.
प्रदीप हा फक्त पटना पायरेट्सचा नाही तर संपूर्ण प्रो कबड्डी मधला सर्वोत्कृष्ट रेडर म्हणून उदयास आला आहे. प्रदीप नरवालने या मोसमात अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याचा साधारण आढावा घेत पाच सर्वात महत्वाचे विक्रम आपण यात समाविष्ट केले आहेत.
१. एका मोसमात सर्वाधिक रेड गुण
प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा आजपर्यंतचा सर्वात मोठा मोसम होता. मागील ३ मोसमातील अनेक विक्रम मोडले जाणार हे निश्चित होते. प्रत्येक संघ साखळी फेरीत २२ सामने खेळणार होता त्यामुळे अनेक कबड्डी-पंडितांना असे वाटत होते, की या मोसमातील सर्वोत्तम रेडर जास्तीत जास्त २०० गुण मिळवेल पण प्रदीप नरवालच्या डोक्यात मात्र काही औरच होते आणि त्याने या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करत ३६९ गुण मिळवले.
प्रो कबड्डीच्या इतिहासात एका मोसमात २०० गुण मिळवणारा प्रदीप पहिला खेळाडू बनला. त्यानंतर त्याने तो विक्रम पुढे नेत ३०० गुण मिळवले. त्यानंतर प्ले ऑफ्स मध्येही त्याने चांगली कामगिरी केली.
पटना पायरेट्स हा संघ त्यांच्या झोन मध्ये पहिल्या क्रमांकावर नसल्यामुळे त्यांना अंतिम सामन्यापर्यंत जाण्यासाठी एलिमिनाटर सामने खेळावे लागले. पण या सामन्यातच प्रदीपने आपली खेळी आणखीन उंचावली आणि प्रत्येक सामन्यात सुपर १० केला.
अंतिम सामन्याआधी प्रदीप नरवालला गुजरात फॉर्च्युनजायंट्सच्या डिफेन्सने रोखून धरले होते. त्यांच्या विरुद्ध मागील दोन्ही सामन्यात एकदाही प्रदीपने त्यांच्यासमोर सुपर १० केला नव्हता. पण अंतिम सामन्यात त्याने आपली खेळी उंचावून १९ गुण मिळवून सर्वात महत्त्वपूर्ण सुपर १० केला.
२. एका सामन्यात सर्वाधिक रेड गुण
युपी योद्धाचा रिशांक देवाडिगा, त्यानंतर बेंगळुरू बुल्सचा रोहित कुमार आणि त्यानंतर पाटणा पायरेट्सचा प्रदीप नरवाल.
या मोसमात एका सामन्यात सर्वाधिक रेड गुणांचा विक्रम तीन वेळा मोडण्यात आला. प्रथम तो युपी योद्धाचा रिशांक देवाडिगाने २८ गुण मिळवत आपल्या नावे केला त्यानंतर पाच दिवसांनी बंगळुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने ३२ गुण हा विक्रम मोडला आणि अखेर पटना पायरेट्सचा स्टार म्हणजे प्रदीप नरवालने हरियाणा स्टीलर्स यांच्याविरुद्ध ३४ रेड गुण मिळवून हा विक्रम आपल्या नावे करून घेतला.
विशेष म्हणजे हरियाणा स्टिलर्स विरुद्धचा हा सामना पटना पायरेट्ससाठी नॉक आऊट सामना होता. पहिल्याच एलिमिनेटरमध्ये प्रदीपने आपल्या नावे हा विक्रम करून घेतला. ३४ रेड गुणांपैकी ३२ गुण हे टच गुण होते तर दोन बोनस गुण होते. विशेष म्हणजे या सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या संपूर्ण संघाचे मिळून ३० गुण होते तर प्रदीप नरवालने एकट्यानेच ३४ गुण मिळवले होते.
३.एका रेडमध्ये सर्वाधिक गुण
हरियाणा स्टिलर्स विरुद्धच्या पहिल्या एलिमिनेटरमध्ये प्रदीप नरवालने हाही विक्रम आपल्या नावे केला. प्रॉ कबड्डीच्या इतिहासात एका रेडमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा तो पहिला खेळाडू बनला. एका रेड मध्ये त्याने हरियाणा स्टिलर्सच्या ६ खेळाडूंना बाद केले. मॅटवर असलेल्या सर्व खेळाडूंना बाद करत त्याने हरियाणा स्टीलर्सला ऑलआऊट केले.
हरियाणा स्टिलर्स संघ हा डिफेन्ससाठी नावाजलेला संघ आहे. त्यामध्ये जय-विरूची जोडी म्हणजेच मोहित चिल्लर आणि सुरेंदर नाडा हे ही होते. पण प्रदीप नरवालला या गोष्टीचा काहीही फरक पडला नाही आणि त्याने या दोन दिग्गज खेळाडूंसह आणखी चार खेळाडूंना बाद करत सहा गुणांची रेड मिळवली.
४. एका मोसमात सर्वाधिक सुपर १०
पटना पायरेट्सकडून खेळताना या रेडरने हाही विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात त्याने गुजरात फॉर्च्युनजायन्टस विरुद्ध सुपरटेन करून १९ सुपर १० या मोसमात केले.
प्रदीप नारवाल हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील सर्व संघांविरुद्ध सुपर टेन केला आहे. अंतिम सामन्याआधी त्याचा गुजरात फॉर्च्युनजायन्टस विरुद्ध चांगला खेळ झाला नव्हता. पण अंतिम सामन्यात त्याने १९ रेड गुण मिळवून गुजरातच्या डिफेन्सला सळो की पळो करून सोडले.
५. सर्वाधिक प्रो कबड्डी चषक जिंकणारा खेळाडू
प्रॉ कबड्डीच्या पाचव्या मोसमात प्रदीप नरवाल हा पटना पायरेटसचा कर्णधार होता आणि त्याने आपल्या संघाला स्वतःच्या बळावर अंतिम सामना जिंकून देऊन तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवले.
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात ४ नवीन संघ आले पण जुन्या संघामधून एक एक खेळाडू राखून ठेवण्यात आला होता. पटना पायरेट्सकडून हा खेळाडू प्रदीप नरवाल होता.
मागील तीन मोसमात अनेक संघ संपूर्णपणे बदलले तर काही संघ आहे तसेच राहिले. पण पटना पायरेट्सच्या चॅम्पियन संघांमध्ये एक गोष्ट जी मागील तिन्ही संघात कायम होती ती म्हणजे प्रदीप नरवाल.
पटना पायरेट्स जेव्हा प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमाचे विजेते ठरले तेव्हा त्यांचा कर्णधार मनप्रीत सिंग होता जो कालच्या अंतिम सामन्यात गुजरात फॉर्च्युनजायन्टसचा प्रशिक्षक होते त्याही संघात प्रदीप होता आणि या मोसमात तर प्रदीपने पटना पायरेट्सचे नेतृत्व केले होते.