पटणा पायरेट्सचा कर्णधार डुबकी किंग प्रदीप नरवाल याने आज बेंगलूरु बुल्स विरुद्ध खेळताना एका मोसमात २०० गुण मिळवण्याचा खूप मोठा कारनामा केला आहे. या अगोदर अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नव्हती. मागील काही सामान्यांपासून हा मोठा विक्रम त्याला सात्यत्याने खुणावत होता.
या सामन्यात त्याने सुरुवातीपासून त्याचे मनसुबे स्पष्ट केले. त्याने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने सुपर रेड करत २०० गुणांच्या जादुई संख्येला गवसणी घातली. या रेडमध्ये त्याने रोहित कुमार, आशिष कुमार आणि प्रीतम चिल्लर या महत्वाच्या खेळाडूंना बाद केले.
एका मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम देखील प्रदीप नरवालच्याच नावे आहे. या सामन्याच्या अगोदर त्याने या मोसमात १४ सामने खेळताना १९१ गुण मिळवले होते. या सामन्यात त्याने ११ गुण मिळवून गुणांची संख्या २०२ गुणांवर नेली. विशेष बाब म्हणजे या मोसमात त्याने सर्व गुण फक्त रेडींगमध्येच मिळवले आहेत. एकही गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवलेला नाही.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर:
# प्रदीप नरवालने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात २०१५ साली म्हणजे प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात केली. त्याला बेंगलूरु बुल्स संघाने करारबद्ध केले होते. परंतु त्याला जास्त संधी मिळाली नाही. त्याला बदली खेळाडू म्हणूनच जास्त संधी देण्यात यायची. त्यामुळे त्याने ६ सामन्यात फक्त ९ गुणांची कमाई केली होती.
# तिसऱ्या मोसमात त्याला पटणा संघाने करारबद्ध केले. या मोसमात त्याने आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित करत १२१ गुणांची कमाई केली. त्याने या मोसमात डुबकी या कौशल्याचे खूप उत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला डुबकी किंग या टोपण नावाने कबड्डीचे चाहते ओळखू लागले. त्याने या मोसमात सर्वाधीक गुण मिळवले होते. पटणाला तिसऱ्या मोसमाचा विजेता संघ बनवण्यात प्रदीपचा खूप मोठा वाटा होता.
# चौथ्या मोसमात पहिल्या काही सामन्यात त्याला रेडींगमध्ये गुण मिळवण्यात थोडे अपयश आले होते. परंतु त्यानंतर त्याने लय पकडली आणि संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले.