रांची लेगमध्ये विक्रमांचा पाऊस पडतो आहे. रांची शहर पटणा पायरेट्सचे घरचे मैदान असल्याने पटणाचा संघ आज पुन्हा मैदानात दिसणार आहे. त्यांचा सामना बेंगलूरु बुल्स विरुद्ध आहे. या सामन्यात या मोसमातील विक्रमवीर प्रदीप नरवाल याला पुन्हा विक्रमाची संधी आहे.
प्रदीप नरवाल याच्या नावावर या मोसमात १९१ गुण आहेत. त्याने आज होणाऱ्या सामन्यात जर ९ गुण मिळवले तर एका मोसमात २०० गुण मिळवणारा प्रदीप नरवाल पहिला खेळाडू ठरणार आहे. मागील काही सामन्यातील त्याची कामगिरी पाहता तो आजच्या सामन्यात हा विक्रम गाठण्याची खूप शक्यता आहे. जर त्याने आजच्या सामन्यात ९ गुण मिळवून २०० गुण मिळवण्याचा विक्रम केला तर सलग चार दिवसात त्याच्या नावावर चार मोठे विक्रम होतील.
रांची लेगच्या सुरुवातीच्या तीन दिवसात त्याने तीन विक्रम केले आहेत
# १५ सप्टेंबर रोजी एका मोसमात सर्वाधिक रेडींग गुणांचा विक्रम त्याने मोडला आणि आपल्या नावे केला.
# दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबरला त्याने एका मोसमात सर्वाधिक एकूण गुणांचा विक्रम मोडला.
# तिसऱ्या दिवशी १७ सप्टेंबर त्याने एका मोसमात सर्वाधिक सुपर टेन मिळवण्याचा विक्रम मोडला आणि विक्रम आपल्या नावे केला.
# सोमवारी प्रो कबड्डीचे सामने होत नाहीत. तो रेस्ट डे असतो. त्यामुळे आजचा दिवस प्रो कबड्डीचा कामाचा दिवस गणला जातो. त्यामुळे जर प्रदीपने आजच्या सामन्यात ९ गुण मिळवत २०० गुणांचा टप्पा पार केला तर सलग चार दिवसात तो चार मोठ्या विक्रमांना गवसणी घालेल.