---Advertisement---

सचिनच्या शेवटच्या सामन्यात खेळलेल्या या भारतीय खेळाडूने ३३ व्या वर्षीच निवृत्तीची केली घोषणा

---Advertisement---

भारताचा फिरकीपटू गोलंदाज प्रज्ञान ओझाने आज(21 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट करत निवृत्तीबद्दल माहिती दिली.

2008 ला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या ओझाने आत्तापर्यंत 24 कसोटी, 18 वनडे आणि 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 113 विकेट्स, वनडेत 21 विकेट्स आणि टी20मध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना 14 ते 16 नोव्हेंबर 2013दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेत खेळला. विशेष म्हणजे त्याचा शेवटचा कसोटी सामना हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचाही शेवटचा कसोटी सामना आहे.

मागील अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी ओझा 2019पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैद्राबाद, बंगाल आणि बिहारकडून खेळला आहे.

ओझाने ट्विटरवर त्याच्या स्टेटमेंटचा फोटो शेअर केला असून यामध्ये त्याने त्याचे संघ सहकारी, त्याचे कर्णधार,  तसेच त्याने खेळलेल्या हैद्राबाद, बिहार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्याने त्याच्या चाहत्यांचे आणि कुटुंबियांनाही धन्यवाद म्हटले आहे.

याबरोबरच ओझाने ट्विट केले आहे की ‘आता माझ्या आयुष्यातील पुढील टप्प्यावर जाण्याची वेळ झाली आहे. प्रत्येकाने मला दिलेला पाठिंबा आणि प्रेम माझ्याबरोबर कायम राहिल आणि मला कायम प्रेरणा देत राहिल.’

ओझाने त्याच्या कारकिर्दीत आयसीसी क्रमवारीत सर्वोत्तम 5 वा क्रमांक मिळवला होता.

तसेच तो आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पर्पल कॅप मिळवणारा(एका आयपीएल मोसमात सर्वाधिक विकेट्स) तो पहिला फिरकीपटू देखील आहे. त्याने 2010ला डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 21 विकेट्स घेतल्या होत्या.

https://twitter.com/Maha_Sports/status/1230751652220567552

https://twitter.com/Maha_Sports/status/1230736216166780928

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---