या मोसमात अमेरिकन ओपन सुपर सिरीज जिंकणाऱ्या प्रणॉयने नुकत्याच संपलेल्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीजच्या उपविजेत्या कोरियाच्या ली ह्युनला हरवत दुसरी फेरी गाठली आहे. त्याने लीचा २१-१५, २१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट प्रणॉयने लीला कोणतीही संधी न देता जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये लीने प्रणॉयला चांगली झुंज दिली.
प्रणीतला त्याच्या विजयासाठी थोडे झगडावे लागले. त्याने थायलंडच्या खोशीत फेतप्रदाबचा २१-१३, २१-२३, २१-१९ असा पराभव केला. प्रणीतने पहिला सेट सहज जिंकला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये तो आघाडीवर असताना थायलंडच्या खोशीतने सामन्यात पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला. यानंतर मात्र प्रणीतने निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये खोशीत १९-१६ असा आघाडीवर असताना खेळ उंचावत नेत सेट २१-१९ असा जिंकत सामनाही जिंकला.
दुसऱ्या फेरीत प्रणॉयची गाठ आता डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टिअन सोलबर्ग विट्टीनघुसशी तर प्रणीतची तीन वेळच्या ऑलंपिक रौप्य पदक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असणाऱ्या मलेशियाच्या ली चॉन्ग वेईशी होणार आहे.
आज झालेल्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीला इंडोनेशियाच्या ४थ्या क्रमांकावर असणाऱ्या टोंतोवि अहमद आणि लिलियाना नात्सीर या जोडीने १५-२१,१२-२१ असे पराभूत केले