टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होतीॉ. त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर, आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्ससोबत त्याचा ट्रेड केला आणि तो मुंबईत परतला. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे मुंबई संघाची कमानही सोपवण्यात आली. रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर हार्दिकला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आलं आहे. या निर्णयाचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. चाहत्यांनी सोशल मीडियावर या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे.
दरम्यान, आता भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारनं मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यावर गंभीर टीका केली आहे. प्रवीण हार्दिक पांड्याचा खरपूस समाचार घेत म्हणाला की, “आयपीएलच्या दोन महिने आधी तुम्हाला दुखापत होते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत नाही किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुमच्या राज्यासाठी खेळत नाही. ते होऊ नये. मला मान्य आहे की पैसे मिळवणं चांगलं आहे, पण तुम्ही देश आणि राज्यासाठीही खेळलं पाहिजे. आजच्या युगात लोक फक्त आयपीएललाच महत्त्वाचं मानत आहेत”.
प्रवीण कुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. या माजी वेगवान गोलंदाजानं युवा खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग पेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. कारकिर्दीत दोन्हींचा समतोल राखण्याचा प्रयत्न कराव. पैसा महत्त्वाचा आहे, पण फ्रँचायझी क्रिकेटला प्राधान्य देणं चुकीचं आहे, असं तो म्हणाला.
IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबई संघानं मिनी लिलावापूर्वी आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. या मोसमात मुंबईनं हार्दिकचा ट्रेड केला आणि त्यानंतर त्याला रोहितच्या जागी कर्णधार बनवलं. IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?