टोकियो पॅरालिम्पिक २०२१ मध्ये भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच आहे. शुक्रवारी (३ सप्टेंबर) भारताच्या खात्यात अजून एक रौप्य पदक जमा झाले आहे. नोएडाच्या प्रवीण कुमार याने पुरुष उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक आपल्या नावे केले आहे. प्रवीण कुमारने २.०७ मीटरची उडी घेत यंदाच्या टोकियो पॅरालिंम्पिकमध्ये दुसरे स्थान गाठले आहे.
कौतुकाची बाब अशी की, प्रवीण कुमारचे वय अवघे १८ वर्षे आहे. १५ मे २००३ साली त्याचा जन्म झाला होता. प्रवीण मूळ नोएडाचा रहिवासी आहे. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्याने ऑलम्पिक पदकाला गवसणी घातली आहे.
ऑलिम्पिक पदक जिंकण्यापूर्वी २०१९ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने जबरदस्त प्रदर्शन करत चौथे स्थान गाठले होते. त्यावेळी त्याचे पदक थोडक्यात हुकले होते. नंतर त्याने यावर प्रचंड मेहनत करत उंच उडी खेळ प्रकारात आपले आणि देशाचे नाव उचांवले आहे.
प्रवीण कुमारचा एक पाय सामान्यांपेक्षा थोडा लहान आहे. किंतु त्याने याच गोष्टीला आपली ताकद बनवून इतिहास रचला आहे. सुरुवातीला तो व्हॉलीबॉल खेळायचा नंतर तो उंच उडी या खेळ प्रकाराकडे वळला. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर प्रशिक्षक सत्यपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला. मेहनत आणि चिकाटी ठेवून सातत्याने कामगिरी करत त्याने हे यश कमावले आहे.
A new Asian Record for Praveen Kumar as he jumps 2.07m in Men’s High Jump T64! 🔥 #GBR's Jonathan Broom-Edwards wins #gold!
🇮🇳's medal tally is now up to 1⃣1⃣! #Tokyo2020 #Paralympics #ParaAthletics pic.twitter.com/uzyjEZ1Qe2
— Olympic Khel (@OlympicKhel) September 3, 2021
विशेष बाब म्हणजे, ज्या सामन्यात त्याने ऑलम्पिक पदकाला गवसणी घातली, त्याच सामन्यात त्याने नवीन आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे. २.०७ मी. उंच उडी घेत त्याने सर्वात उंच उडी मारण्याचा आशियाई विक्रम नोंदवला आहे.
भारताच्या खात्यात पॅराऑलम्पिक स्पर्धेत आतापर्यंत ११ पदके आली आहेत. त्यात २ सुवर्णपदके, ६ रौप्यपदके, ३ कांस्यपदके आहेत. पॅराऑलम्पिकमध्ये भारताने केलेली ही आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विषय आहे का! उंच उडीत भारताला रौप्य अन् कांस्य पदक, मेडल्सची संख्या पोहोचली १० वर
अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव
एकही दिल कितनी बार जितोगे! ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट