जयपूर, ११ जून २०२३: महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने प्रीमिअर हँडबॉल लीगमध्ये अत्यंत रोमहर्षक सामन्यात तेलुगू टॅलोन्सचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. महाराष्ट्र आयर्नमॅनने ३०-२६ अशा विजयाची नोंद केली.
लीगमधील दोन सर्वात आक्रमक संघ तेलुगू टॅलोन्स आणि महाराष्ट्र आयर्नमॅन हे एकमेकांसमोर आले. दोन्ही संघांनी आघाडीसाठी चुरशीचा खेळ केला. त्यामुळे खेळात वेगवान सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. दविंदर सिंग भुल्लर, अनिल खुडीया आणि नसीब यांनी टॅलोन्सला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्र आयर्नमॅनचे इगोर चिसेलिओव्ह, मनजीत कुमार आणि जलाल कियानी हे आक्रमकपणे चेंडू पास करत होते, पण पहिल्या पंधरा मिनिटांत चेंडू तीनवेळा क्रॉसबारवर आदळला. त्यांना नशीब साथ देत नव्हते.
१५व्या मिनिटाला तेलुगू टॅलोन्सने ७-४ अशी आघाडी प्रस्थापित केली होती, तर आयर्नमॅन संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. आयर्नमॅनच्या विजय ठाकूरने हळू हळू सामन्यात संघाला डोकं वर काढून दिले आणि टॅलोन्सचा बचाव भेदण्यासाठी त्याने चिसेलिओव्ह आणि कियानी यांना मदत करण्यास सुरुवात केली.
२०व्या मिनिटाला टॅलोन्सचा स्कोअर ८ असा होता. पहिल्या हाफच्या शेवटच्या १० मिनिटांत टॅलोन्सने पुन्हा आघाडी घेतली आणि पहिला हाफ १४-१२ असा टॅलोन्सच्या बाजूने संपला. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीच्या मिनिटांत आयर्नमॅनच्या विजय ठाकूरला लाल कार्ड दाखवण्यात आले. तरीही आयर्नमॅनकडून कडवी टक्कर मिळत राहिली. दुसऱ्या हाफमध्ये आयर्नमॅनच्या अंकित कुमारने चेंडूवर अधिक काळ ताबा राखला होता आणि त्याच्या खेळामुळे संघाचा आत्मविश्वासही उंचावला.
दोन्ही संघांकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. ४५ व्या मिनिटाला आयर्नमॅनने २२-२० अशी आघाडी घेताना सामन्यात पकड घेतली. आयर्नमॅन संघाचे खेळाडू प्रचंड उत्साह दाखवत होते आणि विरोधकांनी दिलेल्या आव्हानांना सडेतोड उत्तर देत होते. आयर्नमॅन कीपर नवीन देशवालने देखील काही महत्त्वपूर्ण बचाव केले.
जलाल कियानीला आक्रमणाची धार तीव्र करताना प्रत्येक शॉटवर गुण मिळवला. नसीब आणि कैलाश पटेल यांच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही टॅलोन्सना पिछाडी कमी करणे कठीण जात होते. प्रीमिअर हँडबॉल लीगमध्ये तेलुगू टॅलोन्सचा हा पहिला पराभव ठरला. जलालने सर्वाधिक ९ गुण मिळवले, तर नसीब १० गुणांसह टॅलोन्ससाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. आयर्नमॅनच्या जलाल कियानीला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
अंतिम गुण- तेलुगु टॅलोन्स -२६ पराभूत वि. महाराष्ट्र आयर्नमेन- ३०.
महत्वाच्या बातम्या –
आपलं गाऱ्हाणं सोशल मीडियावर मांडणं शुबमनच्या अंगलट, आयसीसीने दिली मोठी शिक्षा; लगेच वाचा
आपलं गाऱ्हाणं सोशल मीडियावर मांडणं शुबमनच्या अंगलट, आयसीसीने दिली मोठी शिक्षा; लगेच वाचा